नवी दिल्ली : काँग्रेसचे स्टार प्रचारक नेते आणि पंजाबमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने 72 तासांची प्रचारबंदी घातली आहे.
नवज्योतसिंग सिद्धू यांनी बिहारच्या कटिहार येथील एका प्रचार सभेत संबोधित करताना वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या वादग्रस्त विधानावर आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी 23 एप्रिलला सकाळी 10 वाजल्यापासून 72 तासांची प्रचारबंदी घातली आहे. यामध्ये निवडणुकीच्या काळात नवज्योतसिंग सिद्धू यांना सार्वजनिक सभा, रोड शो आणि पत्रकार षरिषद घेण्यास बंदी घातली आहे.
दरम्यान, नवज्योतसिंग सिद्धू यांनी बिहारच्या कटिहारमधील सभेत मुस्लिम समुदायामध्ये फूट पाडण्यासाठी मतांचे विभाजन करण्यासाठी एमआयएमसारखी पार्टी अस्तित्त्वात आली आहे. मुस्लिमांनी एकत्र येत एकजूट दाखवली तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव निश्चित होईल, असे नवज्योतसिंग सिद्धू यांनी म्हटले होते.
कटिहार या लोकसभा मतदारसंघात अल्पसंख्याकांची लोकसंख्या जास्त असल्याने मुस्लिम मतदारांना आकर्षिक करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात येत आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले तारीक अन्वर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.