मध्य प्रदेशातील ७३ टक्के बालकांना आहे पंडुरोग; सुशासनाचा दावा फोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 07:54 AM2022-05-21T07:54:27+5:302022-05-21T07:55:14+5:30
संदिग्ध लोक राज्यभरातील अंगणवाड्यांना सकस आहार पुरवठ्याच्या निविदा उचलत आहेत.
अभिलाष खांडेकर, लोकमत न्यूज नेटवर्क
भोपाळ : पाचव्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाच्या (एनएफएचएस) निष्कर्षानुसार मध्य प्रदेशातील सतरा वर्षे जुन्या भाजप सरकारचा सुशासनाचा दावा पुन्हा एकदा उघडा पडला आहे. सर्व्हेक्षणानुसार पोषक आहाराअभावी ६ ते ५९ महिने वयोगटांतील ७३ टक्के बालकांना रक्तक्षय असून, त्यांच्यात लोहाची कमतरता आहे.
आरोग्य विभागाच्या सूत्रांनुसार ताज्या आकडेवारीनुसार चौथ्या आणि पाचव्या एनएफएचएस दरम्यान पंडुरोगाचे प्रमाण ६९ टक्क्यांवरून ७३ टक्क्यांवर म्हणजे चार टक्क्यांनी वाढले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाशी संबंधित भोपाळमधील एका वरिष्ठ डॉक्टरांनी ‘लोकमत’ला सांगितले की, राज्यातील बालक पंडुरोगग्रस्त आहेत. यात नागरी आणि ग्रामीण भागातील मुले आणि मुलींचा सामावेश आहे. पोषक अन्नाच्या पुरवठ्याबाबत वादग्रस्त असलेल्या राज्यांपैकी मध्य प्रदेश एक आहे.
संदिग्ध लोक राज्यभरातील अंगणवाड्यांना सकस आहार पुरवठ्याच्या निविदा उचलत आहेत. पुरवठ्यातील भ्रष्टाचाराच्या तक्रारीवरून अतिरिक्त मुख्य सचिव पदावरील एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याची मागच्या वर्षी बदली करण्यात आली होती. शक्तिशाली अधिकारी आणि राजकीय नेत्यांशी संबंधित इंदूरच्या काही संस्था अंगणवाड्यांना सातत्याने निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवीत होत्या.
मुख्यमंत्री म्हणाले...
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शुक्रवारी अशी प्रतिक्रिया दिली की, मध्य प्रदेशातून कुषोषणाचे निर्मूलन करण्यास मी कटिबद्ध आहे. अंगणवाड्यातील बालकांच्या मदतीसाठी मी भोपाळमध्ये हातगाडा घेऊन अभियान सुरू करणार आहे. लवकरच त्याची तारीख घोषित केली जाईल. कुषोषणासाठी समाजही जबाबदार असून, लोकांनी सरकारला साथ दिली पाहिजे.