नवी दिल्ली- 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे अनेकांचा गोंधळ उडाला. परंतु नोटाबंदीच्या या निर्णयाचा बोगस कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. नोटाबंदीनंतर देशभरात नोंदणी रद्द केलेल्या 73 हजार बोगस कंपन्यांच्या बँक खात्यात 24 हजार कोटी रुपये जमा केले गेले आहेत, अशी माहिती सरकारनं दिली आहे.नोटाबंदीनंतर काळापैसा आणि बेहिशेबी संपत्ती जप्त करण्याच्या इराद्यानं केलेल्या कारवाईत जवळपास 2.26 लाख कंपन्यांना टाळं ठोकण्यात आलं होतं. यातील जास्त करून कंपन्यांचे ब-याच काळ कोणतेही व्यवहार झाले नव्हते. त्यामुळे या कंपन्यांनी काळ्या पैशांची अफरातफर केल्याचा संशय आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून या बोगस कंपन्यांचे आकडेही प्रसिद्ध केले आहेत.2.26 लाख कंपन्यांपैकी 1.68 लाख कंपन्यांच्या बँक खात्यात नोटाबंदीनंतर मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झाल्याची माहिती मिळाली आहे. सरकार अजूनही विविध बँकांकडे या कंपन्यांची माहिती मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यातील 68 कंपन्यांची खोलवर चौकशी सुरू आहे. कागदपत्रांनुसार, सीरियस फ्रॉड इन्वेस्टिगेशन ऑफिस (FSIO) 19 कंपन्यांची सखोल चौकशी करत आहे. तर 49 कंपन्या या रजिस्ट्रार ऑफ कंपनीज (RoC) अंतर्गत आहेत.
नोटाबंदीनंतर 73 हजार बोगस कंपन्यांनी जमा केले 24 हजार कोटी रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2018 1:00 PM