ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - प्रधानमंत्री जन-धन योजने अंतर्गत बँकेत आतापर्यंत ७ कोटीहून अधिक खाते उघडण्यात आले असून यामध्ये ७४ टक्के खाते 'झिरो बॅलेन्स'चे असल्याचे उघड झाले आहे.
'प्रधानमंत्री जन-धन योजना' खातेधारकांना खाते उघडण्यासाठी झिरो बॅलन्सची सुविधा असल्याने अनेकांनी या सुविधाचा फायदा उचलला आहे. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत ७.१ कोटी लोकांनी खाते उघडले असून यामध्ये ५.३ कोटी खातेधारकांनी झिरो बॅलन्स अंतर्गत खाते उघडले आहे. या योजनेअंतर्गत जवळपास ५,४८२ कोटी रूपये बँकेत जमा झाले आहेत. सामाजिक कार्यकर्ते सुभाष अग्रवाल यांना मिळालेल्या माहितीनूसार, ७ नोव्हेंबर २०१४ पर्यंत ७.१ कोटी लोकांनी या योजनेअंतर्गत खाते उघडले आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील ४.२ कोटी लोकांनी तर २.९ कोटी शहरी लोकांनी या योजनेअंतर्गत बँकेत खाते उघडले आहे. खाते उघडणा-या बँकेमध्ये सर्वाधिक खाते ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नवीन १.२ कोटी खाती उघडण्यात आली असून त्यापाठोपाठ ३८ लाख खाती ही बँक ऑफ बडोदा, तर ३७ लाख कॅनारा बँकेत उघडण्यात आली आहेत.