नवी दिल्ली, दि. 14 - 74 टक्के भारतीयांना आपला देश योग्य वाटचाल करत असल्याचा विश्वास वाटत आहे. एका ऑनलाइन सर्व्हेमधून ही माहिती समोर आली आहे. जवळपास 26 देशांमधील नागरिक या सर्व्हेमध्ये सहभागी झाले होते. यावेळी भारतासहित चीन आणि सौदी अरेबियामधील नागरिक आपल्या देशाच्या वाटचालीवर सर्वात जास्त सकारात्मक असल्याचं पहायला मिळालं.
ग्लोबल रिसर्च मार्केटच्या फर्मने हा सर्व्हे केला आहे. दर महिन्याला हा सर्व्हे करण्यात येतो. एकीकडे नागरिक सकारात्मक दिसत असताना दुसरीकडे आपला देश चुकीच्या मार्गाने वाटचाल करत असल्याचं वाटणा-यांची संख्याही जास्त आहे.
चीनमधील 87 टक्के लोकांनी आपला देश योग्य मार्गावर असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. तर भारतामध्ये 74 टक्के आणि सौदी अरेबियामधील 71 टक्के नागरिकांनी आपला देश योग्य वाटचाल करत असल्याचं सांगितलं आहे.
अमेरिका, युके, स्विडन, फ्रान्स, जर्मनी, जपान, ऑस्ट्रेलियादेखील या सर्व्हेत सहभागी झाले होते. या देशांमधील 50 टक्के नागरिक आपल्या देशाच्या कामकाजावर खूश नसून, त्यांनी वाटचालीवर नाराजी व्यक्त केली आहे. बेकारी, राजकीय / आर्थिक भ्रष्टाचार, गरिबी आणि सामाजिक विषमता या प्रमुख समस्या असल्याचं सर्व्हेत सहभागी देशाच्या नागरिकांनी सांगितलं आहे.
भारतीयांनीही आपल्या प्रमुख्य समस्यांची माहिती दिली असून यामध्ये भ्रष्टाचार, बेकारी आणि गुन्हेगारीचा प्रामुख्याने उल्लेख करण्यात आला आहे. चीनमधील नागरिकांनीही हवामान आणि बेकारी मुख्य चिंतेचा विषय असल्याचं सांगितलं आहे. तर सौदीमधील नागरिकांनी बेकारी, दहशतवादी आणि कर या गोष्टी प्रामख्याने सतावत असल्याची माहिती दिली आहे.