- शीलेश शर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय समुदायात वेगळे पाडण्यात भारताला मुत्सद्देगिरीमुळे मोठे यश मिळाले आहे. जगातील जवळपास ७५ देशांना पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा आश्रयदाता बनल्याचे समजावून सांगण्यात भारत यशस्वी ठरला. त्यामुळे जगातील सर्व देशांनी भारताने केलेल्या हवाई कारवार्ईचे समर्थन केले आहे, तर पाकिस्तानने बुधवारी भारतीय हद्दीत घुसून केलेल्या हल्ल्याला कोणाही देशाने समर्थन दिले नाही. काही देशांनी मात्र दोन्ही देशांनी संयम पाळावा, असे आवाहन केले आहे.
आॅस्ट्रेलियाने आपल्या निवेदनात भारतीय कारवाईचे समर्थन करून जैश-ए-मोहम्मद आणि पाकिस्तानच्या नावाचा उल्लेख करून अतिरेकी कारवायांना पाकने आवरावे, असा सल्ला दिला.नियंत्रण रेषेपलीकडे भारताने केलेल्या कारवाईनंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री व इतर देशांच्या प्रतिनिधींशी थेट बोलून त्यांना भारताने कोणतीही लष्करी कारवाई केलेली नाही, तर फक्त दहशतवादाला नष्ट करण्यासाठी मोजक्या ठिकाणांना उद्ध्वस्त करण्याचे काम केले हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
चीनने दोन्ही देशांनी संयम बाळगण्यास सांगितले, तरी चीनचा कल पाहता त्याचे वर्तन व भाषा यांच्यात अंतर असते. आतापर्यंत चीनचा व्यापक पाठिंबा पाकिस्तानला मिळालेला आहे व त्याच बळावर तो भारताविरुद्ध आवाज चढवून बोलत असतो. चीन पाकिस्तानला शस्त्रास्त्रांपासून इतर सगळ्या प्रकारची मदत देत आला आहे. एवढेच काय, मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांत चीनने संयुक्त राष्ट्रांत नकाराधिकाराचा वापर करून अडथळे आणले, पण चीनला भारताशी संबंध बिघडू द्यायचे नाहीत. संबंध चांगले राखण्यामागे मोठी भारतीय बाजारपेठेचे कारण आहे. या बाजारात तो आपली उत्पादने विकत असतो. चीन केवळ आपल्या आर्थिक आणि लष्करी स्वार्थासाठी आणि भारताला दुबळे करण्यासाठी पाकिस्तानसोबत आहे.युरोपीय देशांचाही भारताला पाठिंबायुरोपीय देशांत फ्रान्स, ब्रिटनसह इतर देशांनीही भारताला पाठिंबा दिला, परंतु तो गुळमुळीत होता. त्यात थेटपणे पाकिस्तानचा थेट उल्लेख नसला, तरी बोट त्या दिशेनेच होते. अमेरिकेनेही दोन्ही देशांनी संयम राखून चर्चेद्वारे प्रश्न सोडवावेत, असे म्हटले. या परिस्थितीत भारत सतत जगाला ही जाणीव देत आला आहे की, पाकिस्तान अतिरेक्यांना आश्रयच देतोय, असे नाही तर त्याचे पोषण करून जगाला धोका निर्माण करीत आहे. जो धोका आज भारतासमोर आहे, तो उद्या दुसऱ्या देशांसमोर असेल.