ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 8 - तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुकमध्ये सर्व काही सुरळीत असल्याचे निर्माण करण्यात आलेले चित्र अखेर आभासीच ठरले आहे. मुख्यमंत्रीपद आणि पक्षावर वर्चस्व मिळवण्यावरुन पक्षाच्या सरचिटणीस शशिकला आणि काळजीवाहू मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्या सामना सुरु झाला आहे.
बुधवारी सकाळी पनीरसेल्वम यांनी पुन्हा शशिकला यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. जयललिता यांच्या अखेरच्या दिवसांमध्ये त्यांना साधे पाहण्याची सुध्दा मला अनुमती मिळाली नाही. मी 75 दिवस रोज अपोलो रुग्णालयात जात होतो पण एकदिवसही मला त्यांना भेटण्याची परवानगी दिली नाही असे पनीरसेल्वम यांनी म्हटले आहे.
शशिकला यांना मुख्यमंत्री बनण्याची इतकी घाई का झाली आहे ? त्यांना परिस्थिती समजत नाही का ? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. पनीरसेल्वम यांचे हे आरोप थेट शशिकला यांच्याबद्दलच्या संशयाला बळकटी देणारे आहेत. त्यामुळे येणा-या दिवसांमध्ये हा संघर्ष अधिक तीव्र होणार आहे.
आणखी वाचा
शशिकला आणि पनीरसेल्वम दोघेही जयललिता यांच्या निकट होते. पण स्वत: रुग्णालयात असताना जयललिता यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी पनीरसेल्वम यांच्यावर सोपवली होती. शशिकला जयललिता यांच्यासोबत राहत होत्या. शशिकलांवर इतका विश्वास होता तर, मग मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्यावर का सोपवली नाही असा सवाल विरोधक विचारत आहेत.