ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. २१ - समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव हे उद्या शनिवारी ७५ वाढदिवस मोठया धुमधडाक्यात साजरा करणार आहेत. त्यांच्या वाढदिवसाला ७५ फुट लांबीचा केक बनविण्यात आला असून वाढदिवसासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहेत.
मुलायम यांच्या वाढदिवसासाठी सरकारने २ कोटी रूपये दिले असून रामपूर प्रशासनाने ३० लाख रूपये खर्च करण्याची तयारी दाखविली आहे. नगर विकास खातेही खर्च करणार आहे. वाढदिवसानिमित्त कलाकारांना आमंत्रित करण्यात आले असून हसंराज हंस यांना ११.७५ लाख तर फिरोज खान यांना ३.३० लाख रूपये, साबरी ब्रदर्सला साडेचार लाख रूपये मानधन म्हणून देण्यात येणार आहेत. वाढदिवशी मुलायम सिंह यांची भव्य मिरवणूक काढली जाणार असून त्यासाठी खास लंडनहून व्हिंटेल बग्गी मागविण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून या मिरवणूकीला सुरूवात होणार असून युनिव्हर्सिटी गेटवर मिरवणूक थांबणार आहे. हे १२ किलोमिटरचे अंतर पार करण्यासाठी दोन्ही बाजुला शाळेतील मुले, लोकांना उभे करण्यात येणार आहे. दोन्ही बाजुनी त्यांच्यावर पुष्पाचा वर्षाव करण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त रामपूरमध्ये जवळपास २०० कमानी, शेकडो बॅनर लावण्यात आले आहेत.
वाढदिवसाच्या संपूर्ण सोहळ्याचे लाइव्ह प्रसारण केले जाणार असून त्यासाठी मोठमोठ्या एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. यावेळी मुख्यमंत्री अखिलेश सिंह यादव यांच्यासह उत्तर प्रदेश मंत्रीमंडळातील ५० मंत्री उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, मुलायम सिंह यादव यांच्या वाढदिवसावर होणा-या अमाप खर्चावर काँग्रेस, भाजपाने टीका केली आहे. उत्तरप्रदेशातील ३ हजार शाळेमध्ये पिण्याचे पाणी नाही, ५६ जिल्हयात दुष्काळ असताना मुख्यमंत्री मात्र जनतेच्या पैशांची उधळपट्टी करीत आहेत असा आरोप भाजपाचे नेते विजय भादूर पाठक यांनी केला आहे.