नवी दिल्ली : काश्मिरात यावर्षी मारल्या गेलेल्या अतिरेक्यांमध्ये जवळपास ७५ टक्के अतिरेकी हे स्थानिक होते, अशी माहिती काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दिली. पाकिस्तानच्या अतिरेक्यांना मारणे ही प्राथमिकता असली तरी या अतिरेकी संघटनांमध्ये सहभागी झालेले स्थानिक अतिरेकी मोठ्या प्रमाणात मारले गेले, असेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी मलिक हे दिल्लीमध्ये आले होते. यावेळी मीडियाशी त्यांनी संवाद साधला. पोलिसांच्या आकडेवारीनुसार काश्मीर खोºयात यावर्षी १०३ अतिरेकी ठार झाले. यातील ७६ जण स्थानिक होते. दोन दशकांत असे प्रथमच घडत आहे की, पोलीस चकमकीत मारल्या गेलेल्या अतिरेक्यांत स्थानिकांची संख्या अधिक आहे. गतवर्षी २४६ अतिरेकी चकमकीत मारले गेले होते. यात ६० टक्के म्हणजे १५० अतिरेकी स्थानिक होते. मलिक म्हणाले की, अतिरेक्यांमध्ये निराशा आहे. २०१६ मध्ये बुरहान वानी या अतिरेक्याला मारल्यानंतर काश्मीर खोºयात तीन महिने अशांतता होती. या काळात अनेक तरुण अतिरेकी संघटनेमध्ये सहभागी झाले होते. काही दिवसांपूर्वी झाकीर मुसा याला मारण्यात आले; पण तीन दिवसांपर्यंत याचा कोणताही परिणाम दिसला नाही. झाकीर राशीद भट ऊर्फ मुसा हा अल कायदाशी संबंधित एका संघटनेचा प्रमुख होता. दरम्यान, यावर्षी अतिरेकी संघटनेत सहभागी होणाºया तरुणांच्या संख्येत घट झाली आहे. यावर्षी २५ मेपर्यंत ३३ स्थानिक लोक विविध अतिरेकी संघटनांत सहभागी झाले आहेत.
शोपियांत चकमकीत अतिरेक्यासह दोन ठारजम्मू-काश्मीरच्या शोपियांमध्ये सुरक्षा दल आणि अतिरेकी यांच्यात झालेल्या चकमकीत एक अतिरेकी आणि त्याचा सहकारी ठार झाले. शोपियां-तुर्कवानगोम रोडवर चित्रगाम नाक्यावर सुरक्षा दलाने एक वाहन रोखले. यावेळी वाहनातील अतिरेक्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात फिरदौस अहमद भट आणि वाहन चालक सज्जाद अहमद हे दोघे मारले गेले. हे दोघेही कुलगाम जिल्ह्यातील रहिवासी होते. अन्य एक अतिरेकी अंधाराचा फायदा घेत पळून गेला.