नवी दिल्ली - देशाच्या राजधानीत सध्या नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाची जोरदार चर्चा सुरू आहे. येत्या २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या वास्तूचे उद्घाटन होणार आहे. तत्पूर्वी या कार्यक्रमाची जय्यत तयारी केंद्र सरकारकडून सुरू आहे. त्यात केंद्रीय अर्थ मंत्रालयानेही नव्या संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी ७५ रुपयांचे नाणे जारी करण्याची घोषणा केली आहे. या नाण्यावर नवीन संसद भवनाचे प्रतिकात्मक चित्र छापलेले असेल.
काय आहे ७५ रुपयांच्या नाण्यामध्ये खास?अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या नोटीसनुसार, ७५ रुपयांचे हे नाणे गोलाकार असेल आणि त्याचे क्षेत्रफळ ४४ मिमी असेल. या नाण्याच्या बाजूला २०० शिळे बनवण्यात आले आहेत. हे नाणे ५० टक्के चांदी, ४० टक्के तांबे, ५ टक्के निकेल आणि ५ टक्के जस्त मिसळून तयार केले जाणार आहे.
नाण्यावर सत्यमेव जयते लिहिलेले असेल तसेच अशोकस्तंभही नाण्यावर कोरण्यात येईल. नाण्याच्या डाव्या बाजूला देवनागरी भाषेत भारत आणि इंग्रजीत इंडिया लिहिलेले असेल. त्याचप्रमाणे नाण्याच्या वरच्या बाजूला देवनागरी भाषेत संसद भवन लिहिलेले असेल आणि त्याचवेळी त्याच्या खाली नव्या संसद भवन संकुलाचे चित्र छापले जाईल. नाण्याची रचना राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीनुसार करण्यात आली आहे.
विरोधी पक्षांचा उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार१० डिसेंबर २०२० रोजी नवीन संसद भवनाच्या बांधकामाची पायाभरणी करण्यात आली होती. संसद भवनाच्या नवीन परिसराच्या बांधकामासाठी ८६१ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता पण नंतर तो १२०० कोटी रुपये खर्च झाला. मात्र, संसद भवनाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाबाबतही बरेच राजकारण होत आहे. विरोधी पक्ष नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावे अशी मागणी करत आहेत. यामुळेच २० विरोधी पक्षांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार दिला आहे.
नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते न करणे, या समारंभासाठी राष्ट्रपतींना आमंत्रित न करणे हा देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदाचा अपमान असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. दुसरीकडे भाजपचे म्हणणे आहे की, सभापती हे संसदेचे संरक्षक आहेत आणि त्यांनी पंतप्रधानांना निमंत्रित केले आहे. या मुद्द्यावर राजकारण करू नये.