ओडिशातील एका ७५ वर्षीय व्यक्तीनं कुटुंबातील कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी मोटारसायकलवरुन तब्बल ३०० किमीचा प्रवास केल्याची घटना समोर आली आहे. गंधर्बा जेना (६५ वर्ष) यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना एका स्थानिक रुग्णालयातून शासकीय रुग्णालयात हलवण्यात येत होतं. यादरम्यान गंधर्बा जेना हरवल्याची माहिती त्यांचे नातेवाईक ७५ वर्षीय मधुसुदन पात्रा यांना मिळाली. मधुसुदन यांनी माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न लावता गंधर्बा यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी गावी जायचं ठरवलं. (75-Year-Old Travels 300 Kms on Bike to Help Family of Missing COVID Patient)
मधुसुदन यांनी बँकेतून १० हजार रुपये काढले आणि मोटारसायकलवरुन जवळपास ३०० किमीचा प्रवास करण्याचा निश्चय केला. महत्वाची बाब म्हणजे मधुसुदन हे ७५ वर्षांचे आहेत. त्यांनी ३०० किमीचं अंतर १० तासांमध्ये कापलं आणि ते जगतसिंगपूर जिल्ह्यात म्हणजेच गंधर्बा यांच्या राहत्या घरी पोहोचले.
गंधर्बा हे घरचे कमावते व्यक्ती आहेत. बांबूंपासून विविध वस्तू तयार करुन त्या विकण्याचा व्यवसाय ते करत होते. यातून मिळणाऱ्या पैशातूनच त्यांचं घर चालत होतं. २२ मेपासून ते हरवले आहेत आणि त्यांचं कुटुंबीय त्यांचा शोध घेत आहेत.
गंधर्बा यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करणं अतिशय गरजेचं आहे हे ओळखून मधुसुदन यांनी आधी त्यांचं घर गाठलं आणि गंधर्भा यांच्या कुटुंबियांना १० हजार रुपयांची मदत केली. त्यानंतर तेही आता गंधर्बा यांचा शोध घेत आहेत. "देवाच्या मनात असेल तर गंधर्बा नक्कीच परत येतील असं म्हणून मधुसुदन यांनी आम्हाला १० हजारांची मदत देऊ केली आणि आमचं सांत्वन केलं", असं गंधर्बा यांच्या पत्नी शांती सांगतात.