गाझियाबाद : केरळमधील पूरग्रस्तांना गाझियाबादमध्ये राहणाऱ्या एक 12 वर्षांच्या मुलानं मदतीचा हात दिला आहे. सातवीत शिकणाऱ्या रबजोत सिंहनं खेळण्यांसाठी जमा केलेले पैसे केरळमधील पूरग्रस्तांना दिले आहेत. वृत्तवाहिन्यांवर केरळमधील पूरपरिस्थिती आणि त्यामुळे झालेली नागरिकांची दैना रबजोतनं पाहिली होती. वृत्तवाहिन्यांवर केरळमधील महापुराची दृश्यं पाहून रबजीत हळहळला आणि त्यानं मनी बँकमध्ये साठवलेले पैसे पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला.काल (सोमवारी) रबजोत सिंह त्याच्या आई-वडिलांसह जिल्हाधिकारी कार्यालयात गेला होता. त्यानं अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे साडे सात हजार रुपये सुपूर्द केले. राजनगरमध्ये राहणारा रबजोत सिंह इयत्ता सातवीत शिकतो. त्यानं खेळणी खरेदी करण्यासाठी मनी बँकेत पैसे साठवले होते. मात्र केरळमधील विदारक स्थिती पाहून तो गदगदला आणि त्यानं पूरग्रस्तांना मदत करण्याचं ठरवलं. रबजोतनं त्याच्या मनी बँकेतील 7 हजार 470 रुपये अप्पर जिल्हाधिकारी (अर्थ आणि महसूल) सुनील कुमार सिंह यांच्याकडे सोपवले. 13 सप्टेंबरला रबजोत सिंहचा वाढदिवस असल्याचं त्याची आई सिमरननं सांगितलं. 'वाढदिवसाच्या निमित्तानं खेळणी खरेदी करण्यासाठी रबजोतनं पैसे साठवले होते. मात्र टीव्हीवर केरळमधील स्थिती पाहून त्यानं ते पैसे मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या संवेदनशीलतेचा आम्हाला अभिमान वाटतो,' असं सिमरन म्हणाल्या. रबजोतनं वयाच्या 12 व्या वर्षी दाखवलेल्या या संवेदनशीलतेचं अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केलं.
Kerala Floods: ...अन् त्यानं खेळण्यांसाठी साठवलेले पैसे पूरग्रस्तांना दिले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 12:04 PM