नवी दिल्ली: मोदी सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर दिलीय. कोरोना काळाल महागाई भत्त्यावर लावलेले निर्बंध हटवण्यात आले आहेत. तसेच, महागाई भत्ता 17 वरुन वाढून 28 टक्के करण्यात आलाय. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. सरकारच्या या निर्णयामुळे 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 61 लाख पेंशनधारकांना लाभ होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या निर्णयानुसार गेल्या वर्षी 1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याच्या तीन हफ्त्यांवरील निर्बंध हटवले आहेत. आता हे निर्बंध हटवल्यानंतर तीन हफ्त्यात एकूण 11 टक्के वाढ होणार आहे. म्हणजे महागाई भत्त्याच्या सध्याच्या 17 टक्क्यांमध्ये वाढ होऊन ती 28 टक्के होणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.
काय असतो महागाई भत्ता ?वाढत्या महागाईमुळे सर्वच वस्तुंच्या किंमती वाढतात. लोकांच्या हातात असलेला पैशाचे मूल्य कमी होते. यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला जातो. कोरोना सुरू झाल्यानंतर अर्थव्यवस्थेवरील वाढता ताण पाहता महागाई भत्ते वाढवण्यावर केंद्र सरकारने निर्बंध आणले होते. मागील वर्षी कोरोना महामारी सुरु झाल्यानंतर एप्रिल महिन्यात केंद्रीय कॅबिनेटने सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता दोन हफ्त्यात देण्यावर बंदी आणली होती.