नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट दिले आहे. नरेंद्र मोदी सरकारनेजम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्र शासित प्रदेशातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगानुसार, सर्व भत्ते लागू करण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी मंजुरी दिली आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील कर्मचाऱ्यांना हा भत्ता येत्या 31 ऑक्टोबर 2019 पासून देण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांना प्रवासी भत्ता, वैद्यकीय भत्ता, मुलांच्या शिक्षणासाठी भत्ता यांसारखे भत्ते देण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे 4.5 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने या संदर्भात आवश्यक आदेश जारी केले आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेश आणि लडाखच्या केंद्रशासित प्रदेशातील सरकारी कर्मचार्यांना सातव्या वेतन आयोगानुसार भत्ते देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याची माहिती मंगळवारी देण्यात आली.
गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठे दिवाळी गिफ्ट दिले होते. केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता आणि वाहतूक खर्चा संबंधित मोठा निर्णय घेतला होता. कॅबिनेटच्या बैठकीत महागाई भत्ता मध्ये 5 टक्क्यांनी वाढ करण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला होता. सरकारच्या निर्णयानंतर महागाई भत्ता 12 टक्क्यांनी वाढवून 17 टक्के झाला आहे. त्यामुळे असे सांगण्यात येत आहे की, या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर 16 हजार कोटी रुपयांचा भार पडणार आहे.