हैदराबाद : केंद्रीय जीएसटी अधिकाऱ्यांनी २२४ कोटी रुपयांचा कर घोटाळा उघडकीस आणला आहे. या घोटाळ्यात लोह आणि पोलाद उत्पादनाच्या व्यापाराशी संबंधित असलेल्या आठ कंपन्या सहभागी आहेत. त्यांनी १,२८९ कोटी रुपयांची बनावट बिले (इन्व्हॉइस) तयार करून हा घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे.हैदराबादच्या केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, याप्रकरणी एका संशयितास अटक करण्यात आली असून, १९.७५ कोटी रुपयांची रोख रक्कम त्याच्याकडून जप्त करण्यात आली आहे. घोटाळ्यात सहभागी असलेल्या कंपन्यांच्या विविध ठिकाणांवर धाडी टाकून तपासणी करण्यात आली.यात निवासस्थाने आणि कार्यालयांचा समावेश आहे. या धाडीत महत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. निवेदनात म्हटले आहे की, जुलै २0१७ पासून हा घोटाळा सुरू होता. घोटाळेखोर कंपन्या टीएमटी सळया, एमएस सळया आणि एमएस फ्लॅट उत्पादने इत्यादी उत्पादनांचा व्यवसाय करतात. या कंपन्यांनी या सळयांचा कोणत्याही प्रकारे पुरवठा न करताच खोटी बिले तयार करून माल विकल्याचे दाखविले. आपल्याच समूहातील कंपन्यांना माल खरेदीदार दाखविले. खरेदीदार कंपन्यांच्या नावे इनपुट टॅक्स क्रेडिट हस्तांतरित करण्यात आले. या कंपन्यांनी तयार केलेल्या बनावट बिलांची रक्कम १,२८९ कोटी रुपये आहे. यातून त्यांना २२४ कोटी रुपयांचे इनपुट क्रेडिट मिळाले. (वृत्तसंस्था)पाच कंपन्या, पत्ता मात्र एकचनिवेदनात म्हटले आहे की, घोटाळ्यातील पाच कंपन्यांना पत्ता एकच आहे. या कंपन्यांचे अनेक संचालक, भागीदार आणि मालमत्ताही समान आहेत. आपली उलाढाल वाढवून दाखविण्यासाठीही या कंपन्यांनी बनवेगिरी केल्याचे तपासात आढळून आले आहे.
८ कंपन्यांनी केला २२४ कोटींचा जीएसटी घोटाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 6:57 AM