बेळगाव – जिल्ह्यातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानंतर तणाव निर्माण झाला होता, रातोरात शिवरायांचा पुतळा हटवल्यामुळे शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती, या घटनेने संतप्त शिवप्रेमींनी कर्नाटक सरकारच्या दडपशाहीविरोधात आंदोलनं केली. अनेकांनी मुख्यमंत्र्यांचे प्रतिकात्मक पुतळे दहन केले, सीमाभागातील कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
छत्रपतींचा पुतळा हटवल्यामुळे मनगुत्ती गावात तणावाचं वातावरण होतं, याठिकाणी मराठी बांधव रस्त्यावर उतरला होता, विशेषत: या आंदोलनात महिलांची संख्या लक्षणीय होती. सकाळी अतिरिक्त पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी आणि हुक्केरी तहसीलदार व गावातील पंचाची बैठक झाली या बैठकीत आगामी आठ दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा बसवण्याचा निर्णय झाला आहे. आठ दिवसात सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा प्रतिष्ठापणा करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वातावरण तापलं होतं. गावात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आला आहे. तहसीलदार आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी ,पंच मंडळी यांची बैठक झाली यावेळी बैठक संपताच पोलिसांनी ग्राम पंचायत व शाळेसमोर जमलेल्या ग्रामस्थांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला तरीही ग्रामस्थांच्या मनातील रोष कमी होत नव्हता. ५ ऑगस्ट रोजी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता. गावातील एका गटाचा त्याला विरोध होता. ग्राम पंचायतीने परवानगी दिली होती. पण शुक्रवारी रातोरात हा पुतळा हटवण्यात आल्याने गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली.
गावातील महिला,तरुण संख्येने गावातील चौकात जमले. पोलीस, प्रशासन आणि गावकऱ्यांमध्ये बैठक झाली. शिवरायांचा पुतळा त्वरित बसवावा अशी ग्रामस्थांची आग्रही मागणी आहे. पुतळा बसवेपर्यंत मागे हटणार नाही अशी ग्रामस्थांची भूमिका आहे. बेळगावातून श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, युवा कार्यकर्ते गौरांग गेंजी, सांगलीतील बेळगाव मधील शिव प्रेमी युवक यावेळी उपस्थित होते. एकमेकांच्या सहमतीने आठ दिवसात तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. दुपारनंतर बेळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी देखील मनगुत्ती गावाला भेट देऊन पाहणी केली.