लखीसराय - बिहारच्या लखीसरायमध्ये एक धक्कदायक घटना समोर आली आहे. लग्न मंडपात भरधाव वेगाने येणारा ट्रक घुसल्याने आठ जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्री (10 जुलै) ही दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, लखीसरायच्या हलसी बाजार परिसरात एका लग्न समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. लग्न समारंभाला मोठ्या संख्येने लोकांनी हजेरी लावली होती. मात्र बुधवारी रात्री समारंभ सुरू असताना भरधाव वेगाने येणारा एक ट्रक अचानक मंडपात घुसला. ट्रकखाली चिरडले गेल्याने आठ लोकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले असून याचा तपास सुरू करण्यात आले आहे. ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक लग्न मंडपात घुसल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेनंतर ट्रक चालक फरार झाला असून त्याचा पोलीस शोध घेत आहे. मृतांच्या नातेवाईकांनी या दुर्घटनेनंतर आक्रोश केला. तसेच काही काळ रास्ता रोको केला होता. नुकसान भरपाईची मागणी ही मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे. सध्या या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.