रांची : २३ दिवसांच्या मुलीच्या पोटातून आठ भ्रूण काढण्यात आल्याचा प्रकार रांची येथील एका रुग्णालयात घडला आहे. नवजात मुलीच्या पोटातून भ्रूण बाहेर येण्याच्या घटना दुर्मीळ असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. आठ भ्रूण काढण्याची ही जगातील पहिलीच घटना आहे.झारखंडमधील रांची येथील राणी चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये एका नवजात मुलीवर उपचार सुरू होते. प्राथमिक उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आणि २१ दिवसांनी बोलावण्यात आले. २ नोव्हेंबर म्हणजेच बुधवारी तिच्यावर शस्त्रक्रिया केली असता ८ भ्रूण बाहेर काढण्यात आले.
याला नेमके काय म्हणतात?
मुलीवर शस्त्रक्रिया करणारे डॉ. इम्रान म्हणाले की, ‘याला फीट्स इन फीटू म्हणतात. जगात ५-१० लाख मुलांपैकी एका मुलामध्ये असा प्रकार घडतो. आतापर्यंत जगभरात अशी २०० पेक्षा कमी प्रकरणे आढळून आली आहेत. ८ भ्रूण काढण्याची ही जगातील पहिलीच घटना आहे.
असे नेमके का होते?
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनुपमा शर्मा यांनी सांगितले की, यात बाळाच्या पोटात बाळाची निर्मिती सुरू होते. गर्भाशयात एकापेक्षा जास्त मुले वाढत असतील, तर गर्भाच्या विकासादरम्यान ज्या पेशी बाळाच्या आत गेल्या, त्या गर्भाची निर्मिती मुलाच्या आत सुरू होते. पेशी कशा प्रवेश करतात याबद्दल ठोस कारण नाही.
बाळाच्या पोटात बाळ आहे कसे कळते?
नवजात अर्भकाच्या ओटीपोटावर सूज असते. लघवी येणे बंद होते. यावेळी प्रचंड वेदना होत असतात. या लक्षणांनंतर, डॉक्टर तपासणी करतात.