अयोध्येतील राम मंदिराची तारीख आता निश्चित झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. राम मंदिर तीर्थक्षेत्र यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रणही देण्यात आलं आहे. त्यामुळे, आता जोरात आणि वेगानं मंदिर उभारण्याची व सर्वच बाबींची तयारी सुरू आहे. त्यातच, प्रभू श्री राम विराजमान होत असलेल्या गाभाऱ्यात ८ फूट उंच सिंहासन असणार आहे. उच्च दर्जाच्या मार्बलचं हे सिंहासन ८ फूट उंच, ३ फूट लांब आणि ४ फूट रुंद असणार आहे. विशेष म्हणजे या सिंहासनाला सोन्याचा मुलामा देण्यात येणार आहे. त्यामुळे, हे सिंहासन सुवर्णजडीत असेल.
रामलल्लाची मूर्ती विराजमान करण्यासाठी संगमरवराच्या या सिंहासनाला सोन्याचा मुलामा देण्यात येत असून राजस्थानमधील कारागिरांकडून सिंहासन बनवलं जात आहे. १५ डिसेंबरपर्यंत हे सिंहासन अयोध्येत पोहोचेल. श्री राम जन्मभूमीत तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांनी यासंदर्भात माहिती दिली. हे सिंहासन मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवण्यात येईल.
मंदिरासाठी रामभक्तांनी मोठ्या प्रमाणात सोनं, चांदीसह मौल्यवान वस्तू दान केल्या आहेत. भक्तांकडून आलेल्या या सोन्याच्या विटा वितळवून त्याचा एक खंड बनविण्यात येईल. कारण, लहान-सहान मौल्यवान वस्तूंचा सांभाळ करताना ट्रस्टला मोठ्या अडचणी येत आहेत. म्हणून, एका प्रतिष्ठीत संस्थेच्या माध्यमातून हे काम पूर्ण केले जाईल, असेही मिश्रा यांनी सांगितले.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे, काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी, गरजेनुसार कारागिर व मजुरींची संख्या वाढविण्यात आली आहे. १५ डिसेंबपरपर्यंत राम मंदिराचा ग्राऊंड फ्लोअर पूर्णपणे तयार झाला पाहिजे, अशा गतीने हे काम सुरू आहे. येथील पहिल्या मजल्यावरील ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. तर, मंदिराच्या गाभाऱ्याचं काम यापूर्वीच पूर्ण झालंय. सध्या गाभाऱ्यातील परिसरात संगमगरवरी काम सुरू आहे. तसेच, पायऱ्यांसह इतरही ठिकाणावर फरशी बसवण्याचं काम सध्या वेगात आहे. पहिल्या मजल्यावरील एकूण १९ स्तंभापैकी १७ स्तंभ उभारण्यात आले आहेत. १५ डिसेंबरपर्यंत पहिल्या मजल्यावरील छताचेही काम पूर्ण होणार आहे.
दरम्यान, भक्त निवासाच्या तीन मजली इमारतीचंही काम पूर्ण झालं आहे. येथे सुरक्षा संबंधित सर्व यंत्रणाही बसवण्यात आली आहे.