तिरुपती : आंध्र प्रदशातील चित्तूर जिल्ह्यातील भाकरापेटमध्ये शनिवारी रात्री भरधाव बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात ८ जण ठार, तर अन्य ४४ जण जखमी झाले. घाटात चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला, असे पोलिसांनी सांगितले.
अपघातात ठार झालेले सर्व एकमेकांचे नातेवाईक होते आणि ते अनंतपुरमू जिल्ह्याचे होते. रविवारी सकाळी आयोजित विवाहसोहळ्यासाठी ते धर्मावरमहून तिरुपतीला जात असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. मृतांमध्ये एका स्थानिक पत्रकाराचाही समावेश आहे. अंधारामुळे बचाव कार्याला खूप वेळ लागला, असे पोलिसांनी सांगितले. तिरुपतीचे पोलीस अधीक्षक सीएच. व्ही. अप्पला नायडू आणि पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन जखमींना रस्सीच्या मदतीने बाहेर काढले आणि इस्पितळात दाखल केले. नंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले.
आंध्र प्रदेश सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना दोन-दोन लाख आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत घोषित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करून मृतांच्या कुटुंबीयांना दोन-दोन लाख आणि जखमींना ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान घोषित केले आहे. राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन, मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी, तेलगू देसम पार्टीचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू, भाजपचे प्रदेशाध्यक्ष एस. विष्णुवर्धन रेड्डी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष एस. सैलजनानाथ आदींनी शोक व्यक्त केला आहे.