नवी दिल्ली : महाराष्ट्रातील एक लाखांहून अधिक अंगणवाड्यांमध्ये ८ लाख बनावट लाभार्थी आढळून आले आहेत. केंद्रीय महिला व बालकल्याण विभागाच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. त्याने सांगितले की, राज्यात १ लाख ९ हजार अंगणवाड्या असून त्यात एकूण ६१ लाख लाभार्थी आहेत. त्यांची जुलैपासून तपासणी सुरू केली. ती अद्याप पूर्ण झालेली नाही. लाभार्थी आधारशी जोडले गेल्याने बनावट नावे उजेडात येऊ शकली.
आसाम, उत्तर प्रदेशमध्ये अंगणवाडीतील बालकांची प्रत्यक्ष मोजणी केली असता प्रत्येकी १४ लाख बनावट नावे आढळून आली होती. त्यानंतर खडबडून झालेल्या झालेल्या केंद्र सरकारने देशभरातील अंगणवाड्यांमध्ये लाभार्थींची तपासणी मोहिम हाती घेतली. अंगणवाडीत दररोज सकस आहार देण्यास प्रत्येक बालकामागे केंद्र सरकार ४ रु. ८० पैसे तर राज्य सरकार ३ रुपये २० पैसे अनुदान देते. या अंगणवाड्यांना जे अन्नधान्य वितरित केले जाते त्यातही अनेक गैरप्रकार आढळून आले. त्यामुळे अंगणवाड्यांतील बालकांची पुन्हा नीट मोजणी करावी अशी सूचना केंद्रीय महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री मनेका गांधी यांनी सर्व राज्य सरकारांना केली होती. देशात १४ लाख अंगणवाड्या असून त्यात १० कोटीलाभार्थी आहेत. त्यात सहा वर्षे वयाखालील मुले, गरोदर महिला व बालकांना स्तनपान करणाऱ्या मातांचा समावेश आहे.