नवी दिल्ली - कोरोनाने देशात थैमान घातले आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. होमिओपॅथिक औषध (Homeopathic Medicine ) घेतल्यानंतर एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच पाच जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये हा भयंकर प्रकार घडला आहे. एका कुटुंबातील सदस्यांनी होमिओपॅथिक औषधांचं सेवन केलं. त्यानंतर 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 5 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला याबाबत माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "या लोकांनी ड्रोसेरा 30 (Drosera 30) हे होमिओपॅथिक औषध घेतलं होतं. ज्यामध्ये 91% अल्कोहोल होतं. हे औषध देणारा डॉक्टर फरार झाला आहे". पाच जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र त्यांची प्रकृती ही चिंताजनक आहे. होमिओपॅथिक औषध घेतल्यावर सर्वांचीच प्रकृती बिघडली होती. याचवेळी आठ जणांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
मोठा निष्काळजीपणा! ...अन् उंदीर, मुंग्यांनी खाल्ला महिलेचा मृतदेह; घटनेने खळबळ
देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. कोरोनाच्या संकटात डॉक्टर्स, आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. मात्र याच दरम्यान आरोग्य विभागाचा मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेचा चार दिवसांपासून शवविच्छेदनगृहातच पडून होता. हा मृतदेह अक्षरशः सडला होता. याशिवाय उंदीर आणि मुंग्यांनी मृतदेहाचा बहुतेक भाग खाल्ला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) आजमगडमधील (Azamgarh) जिल्हात ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. महिलेचा मृतदेह सडल्यामुळे सर्वत्र दुर्गंध पसरला होता. त्यामुळेच नंतर ही घटना उघडकीस आली. चार दिवस हा मृतदेह शवविच्छेदनगृहात पडून होता. मृतदेहाला मुंग्या आणि उंदीर खात राहिले. मात्र, तरीही या गोष्टीची कोणालाच कल्पना कशी नव्हती असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. यानंतर या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.