श्रीनगर: काश्मीरच्या उत्तर भागातील बारामुला जिल्ह्यात भारतीय लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत 'लष्कर-ए-तोयबा'चं टेरर मॉड्युल पकडण्यात यश आलं आहे. काश्मीरमधील गुप्तचर यंत्रणेकडून माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कर आणि स्थानिक पोलिसांनी केलेल्या कारवाईत दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या 8 जणांना सोमवारी अटक केली असून त्यांची आता कसून चौकशी सुरु करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले की, बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमधील गुप्तचर यंत्रणेकडून काही व्यक्ती दहशतवाद्यांना मदत करत असल्याची संबंधीत माहिती प्राप्त झाली होती. त्यानंतर स्थानिक पोलिस व भारतीय लष्कराने मोठी कारवाई करत शोधमोहीम सुरु केली होती. यानंतर या कारवाईत अजीज मीर, ओमर मीर, तौसीफ नजर, इमतीयाज नजर, ओमर अकबर, फैजान लतीफ, दनीश हबीब आणि शौकत अहमद मीर यांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच अटक करण्यात आलेल्याजवळ काही संशयास्पद वस्तू देखील सापडल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
त्याचप्रमाणे बारामुल्ला येथील दुकानदारांना बाजार बंद ठेवण्यासाठी धमकी देण्याच्या तसेच परिसरात धमकी देणारी पोस्टर्स लावण्याच्या घटनांमध्येही अटक करण्यात आलेल्या लोकांचा हात असल्याचे समोर आले आहे.