सूरत, दि. 21 - हि-यांचं शहर म्हणून ओळखल्या जाणा-या सूरतमध्ये अवयव दानामुळे आठ लोकांना नवीन आयुष्य मिळालं आहे. फक्त 48 तासात इतक्या जणांनी अवयवदान केलं आहे की, आठ जणांना जीवनदानच मिळालं आहे. रविवारी दोन ह्रदय, चार किडनी आणि दोन यकृत दान करण्यात आले होते. दोन दिवसांपुर्वी सूरतमध्ये एका व्यक्तीने अवयवदान केलं होतं. दान करण्यात आलेलं एक ह्रदय मध्य प्रदेशातील इंदोरला पाठवण्यात आलं होतं. तर एक मुंबईमधील फोर्टिज रुग्णालयात पाठवण्यात आलं होतं. ह्रदय दान करण्याची शहरातील ही चौदावी घटना होती.
30 वर्षीय विलास घाटला दहीहंडीदरम्यान झाडावरुन पडला होता. ज्यामुळे विलास गंभीर जखमी झाला होता. त्याला सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं असता, ब्रेन हॅमरेज झाला असल्याचं लक्षात आलं. सूरतमधील न्यू सिव्हिल रुग्णालयात त्याला नेण्यात आलं असता ब्रेन डेड घोषित करण्यात आलं. रुग्णालयाने डोनेटलाइफच्या स्वयंसेवकांशी संपर्क साधून माहिती दिली असता, त्यांनी विलासच्या कुटुंबियांशी संपर्क साधून अवयनदान करण्यासाठी तयार केलं. विलासचं ह्रदय मुंबईमधील 20 वर्षीय विद्यार्थिनीला देण्यात आलं आहे. यशस्वीपणे ह्रदयाचं प्रत्यार्पण करण्यात आलं.
विलासची किडनी गांधीधामधील 46 वर्षीय जिमी अशोक दलाल आणि राजस्थानच्या मितीका सोनी यांना देण्यात आली. तर यकृत 38 वर्षीय ईश्वार मेंदपाडा यांना देण्यात आलं.
पुण्यातही अवयवदानामुळे एका पेशंटचा जीव वाचल्याची घटना काही दिवसांपुर्वी समोर आली होती. पुण्यामधील रुबी रुग्णालयात 22 वर्षीय महिलेला ब्रेन डेड घोषित करण्यात आलं होतं. 16 ऑगस्ट रोजी महिला डोक्यावर पडून जखमी झाली होती. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांना ब्रेन डेड घोषित करण्यात आलं होतं. पत्नीच्या मृत्यूनंतर दुखा:चं आभाळ कोसळलं असतानाही त्यांच्या पतीने अवयवदान करण्याची तयारी दर्शवली होती. यानंतर तात्काळ त्यांचं फुफ्फूस चेन्नईच्या रुग्णालयात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. तेथील एका रुग्णाला याची तात्काळ गरज होती.
पुण्यामधील रुबी हॉल रुग्णालयामधून चेन्नईच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये यशस्वीपणे हे फुफ्फूस पाठवण्यात आलं होतं. डॉक्टरांनी यशस्वीरित्या फुफ्फुसाचं प्रत्यारोपण करत रुग्णाचा जीव वाचवला होता. दान करण्यात आलेल्या एखाद्या फुफ्फुसासाठी पार करण्यात आलेलं हे आतापर्यंतचं सर्वात मोठं अंतर होतं अशी माहिती चेन्नईमधील ग्लोबल हॉस्पिटलने दिली होती.