नवी दिल्ली : विदेशात वैद्यकीय शिक्षण घेऊन परतलेल्या विद्यार्थ्यांना भारतात प्रॅक्टिस करण्यासाठी फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट्स एक्झाम (एफएमजीइ) ही परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. पण अशा दर दहा विद्यार्थ्यांपैकी आठ विद्यार्थी या परीक्षेत नापास झाल्याचे आढळून आले आहे.
युक्रेनमधून वैद्यकीय पदवी घेऊन आलेल्यांनाही ही परीक्षा देणे बंधनकारक आहे. राष्ट्रीय परीक्षा मंडळाच्या (एनइबी) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विदेशातून वैद्यकीय शिक्षण घेऊन भारतात परतणाऱ्यांची संख्या वाढत आहे. २०२० साली विदेशातून वैद्यकीय पदवी शिक्षण घेऊन आलेल्या ३५ हजार ७७४ विद्यार्थ्यांनी एफएमजीइ परीक्षा दिली. त्यातील ५ हजार ८९७ जण म्हणजे १६.४८ टक्के लोक ही परीक्षा उत्तीर्ण झाले. गेल्या सहा वर्षांची आकडेवारी पाहिली तर १.२६ लाख लोकांनी एफएमजीइ ही परीक्षा दिली. त्यातील २१ हजार जण ही परीक्षा पास झाले.
१५ लाख लोक युक्रेनमधून बाहेर युद्धामुळे सुमारे १५ लाख नागरिक युक्रेनमधून बाहेर पडले आहेत, अशी माहिती संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार संघटनेने दिली आहे. रशियाने फेसबुक आणि ट्वीटरवर बंदी घातली आहे. रशियन माध्यमांच्या बातम्यांबाबत भेदभाव केल्याचा आराेप करून पुतीन प्रशासनाने ही कारवाई केली आहे. रशियामध्ये असलेल्या ब्रिटिश नागरिकांनी तेथे थांबणे आवश्यक नसल्यास तत्काळ रशिया साेडण्याच्या सूचना ब्रिटनने दिल्या आहेत. रशियाने ताबा घेतलेल्या खेरसन आणि बर्डीयान्स्क या शहरांमधील नागरिकांनी रशियाविराेधात निदर्शने केली. अमेरिकेतील आपल्या मुत्सद्द्यांना परत आणण्यासाठी रशियाने विशेष विमान पाठविले आहे. अमेरिकेसाेबत काेणत्याही प्रकारची चर्चा करणार नसल्याचे रशियन परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.