ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - विजय माल्याच्या बुडीत कर्ज प्रकरणात सीबीआयनं किंगफिशरचे 4 अधिकारी आणि आयडीबीआय बँकेच्या चार माजी अधिका-यांना अटक केली आहे. विशेष म्हणजे अटक झालेल्यांमध्ये आयडीबीआय बँकेच्या माजी अध्यक्षांचाही समावेश आहे. किंगफिशरचे माजी व्यवस्थापकीय संचालक योगेश अग्रवाल आणि आयडीबीआय बँकेचे उप व्यवस्थापकीय संचालक बी. के. बत्रा यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती 'पीटीआय'ने दिली आहे. विजय माल्याच्या नेतृत्वाखाली असलेल्या यूबी ग्रुपवर सीबीआयनं धाड टाकली आहे. विजय माल्ल्याने 6 हजार 209 कोटी रुपयांच्या बुडवलेल्या कर्जाची यूबी ग्रुपकडूनच वसुली करण्यात येत आहे. सीबीआयनं या प्रकरणात आयडीबीआय बँक आणि किंगफिशर एअरलाइन्सवरही गुन्हा नोंदवला आहे. बँकांचे कर्ज बुडवल्यानंतर माल्या 2 मार्च 2016लाच इंग्लंडला पळून गेला. सक्तवसुली संचलनालयाच्या याचिकेवरून मल्ल्यावर हवाला रॅकेट चालवत असल्याचा ठपकाही मुंबई उच्च न्यायालयानं ठेवला आहे.