दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये एका कार्यक्रमादरम्यान गेट क्रमांक दोनजवळ एक मोठा मंडप कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर एकच गोंधळ उडाला. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या घटनेत आठ जण जखमी झाल्याची माहिती आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे.
जवाहरलाल नेहरू स्टेडियममधील मंडप कोसळण्याच्या घटनेतील जखमींना जवळच्या सफदरजंग हॉस्पिटल आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, दिल्लीच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.
मंडप कोसळल्याच्या घटनेबाबत दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या परिसरात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, "कामगार जेवण करत असताना ही घटना घडली. यामुळे कोणताही मोठा परिणाम किंवा मोठं नुकसान झालेलं नाही."
अग्निशमन दल, दिल्ली पोलीस आणि घटनास्थळी उपस्थित लोकांकडून घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. या घटनेत मंडपाखाली आणखी लोक दबले असण्याची शक्यता आहे. अधिक तपास सुरू आहे. दिल्लीचे व्हीआयपी खान मार्केटही याठिकाणाच्या जवळ आहे.