गावात एकाचवेळी ८ जणांवर अंत्यसंस्कार, गावकऱ्यांचे डोळे पाणावले; घरी चूलही पेटली नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 13:38 IST2025-04-04T13:37:29+5:302025-04-04T13:38:13+5:30
या दुर्घटनेवर शोक व्यक्त करत मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मृत कुटुंबाच्या वारसांना प्रत्येकी ४ लाख रूपये देण्याची घोषणा केली आहे

गावात एकाचवेळी ८ जणांवर अंत्यसंस्कार, गावकऱ्यांचे डोळे पाणावले; घरी चूलही पेटली नाही
मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील कोंडावत गावात एका भीषण दुर्घटनेने शोककळा पसरली आहे. शुक्रवारी याठिकाणी ८ मृतदेहांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. गावात जेव्हा एकत्र ८ तिरड्या उठल्या तेव्हा प्रत्येकाचे डोळे हे दृश्य पाहून पाणावले. कुटुंबासह संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले. कुणाच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले तर कुणी आपला भाऊ गमावला. काही कुटुंबाचा घरातील एकुलता एक आधार गेला.
गावात एकाही घरात चूल पेटली नाही
कोंडावत गावात कुणाच्याही घरी चूल पेटली नाही. गुरुवारी झालेल्या दुर्घटनेत ८ जणांचे जीव गेले. या घटनेमुळे खंडवा जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात आली. स्वच्छता करण्यासाठी विहिरीत उतरलेल्या ८ जणांचा विषारी वायूमुळे मृत्यू झाला. या सर्वांना खंडवा जिल्ह्यातील मेडिकल कॉलेज हॉस्पिटलला आणले. पोस्टमोर्टमनंतर ८ जणांचे मृतदेह कुटुंबाला सुपूर्द केले.
कशी घडली दुर्घटना?
गावात देवी मातेचे विसर्जन होणार होते. परंपरेनुसार हे विसर्जन गावातील एका विहिरीत केले जाते. सुरुवातीला ३ जण विहिरीत उतरले होते परंतु जेव्हा ते बुडायला लागले तेव्हा त्यांना वाचवण्यासाठी आणखी ५ जणांनी विहिरीत उडी घेतली. दुर्दैवाने ते सगळे आतच अडकले आणि सर्वांचा मृत्यू झाला. विहिरीतील विषारी वायूमुळे या सर्वांचा जीव गुदमरून मृत्यू झाल्याचे समोर आले. या दुर्घटनेत राकेश पटेल, वासूदेव पटेल, अर्जुन पटेल, गजानन पटेल, मोहन पटेल, अजय पटेल, शरण पटेल, अनिल पटेल यांचा मृत्यू झाला आहे.
प्रत्येक कुटुंबाला ४ लाख मदतीची घोषणा
या दुर्घटनेवर शोक व्यक्त करत मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मृत कुटुंबाच्या वारसांना प्रत्येकी ४ लाख रूपये देण्याची घोषणा केली आहे. दु:खाच्या या प्रसंगी माझ्या सहवेदना कुटुंबाच्यासोबत आहेत. या दुर्घटनेतील मृतांना ईश्वर चिरशांती देवो आणि कुटुंबाला हे दु:ख सहन करण्याची ताकद मिळो असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.