ऑनलाइन लोकमत -
बंगळुरु, दि. २२ - दिल्लीत मेट्रो स्टेशनबाहेर निदर्यीपणे कुत्र्यांची हत्या करणारा व्हिडिओ समोर आला असताना बंगळुरुतदेखील अशीच घटना समोर आली आहे. पुनम्मा या महिलेने कुत्रीला धडा शिकवण्यासाठी 8 पिल्लांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे.
पुनम्मा राहत असलेल्या घराजवळ ही पिल्ले जन्माला आली होती. याचाचा राग धरुन त्यांच्या आईला धडा शिकवण्याचा हेतूने पुनम्मा या महिलेने हे कृत्य केल्याचं महिलेच्या शेजा-यांनी सांगितलं आहे. महिलेने या पिल्लांना दगडावर फेकून दिले ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. 15 मार्चला ही घटना घडली होती. प्राणीप्रेमींनी ही घटना समोर आणल्यानंतर पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे.
'परिसरातील लहान मुलांसाठी ही महिला धोका आहे. लोकांनी या महिलेपासून सावधान राहण्याची गरज असल्याचं', स्थानिक कार्यकर्त्या तमन्ना यांनी म्हंटलं आहे. 'आपल्याकडे कायदा आहे, तुम्ही इतके निष्ठूर नाही होऊ शकत. या महिलेवर सामाजिक बहिष्कार टाकण्याची गरज आहे जेणेकरुन तिला वेदना कळतील', असं मत तमन्ना यांनी मांडलं आहे.