VIDEO: आठ वर्षांच्या मुलीनं समजावला राफेल करार; संरक्षणमंत्र्यांनी मानले आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 10:16 AM2019-01-12T10:16:33+5:302019-01-12T10:18:56+5:30
निर्मला सीतारामन यांच्याकडून मुलीचं कौतुक
नवी दिल्ली: संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या ट्विटमुळे पुन्हा एकदा राफेल डीलचा मुद्दा चर्चेत आला आहे. राफेल डील नेमकं आहे तरी काय, हे समजावून सांगणाऱ्या एका आठ वर्षीय मुलीचा व्हिडीओ संरक्षणमंत्र्यांनी ट्विट केला आहे. या मुलीनं कंपास पेटीच्या मदतीनं संपूर्ण राफेल डील स्पष्ट करुन सांगितलं आहे. याबद्दल सीतारामन यांनी मुलीचे आभार मानले आहेत.
राफेल विमानाची यूपीए आणि एनडीए सरकारच्या काळातील किंमत, त्यातील फरक एका आठ वर्षीय मुलीनं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या मुलीचा व्हिडीओ संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विटरवरुन शेअर केला आहे. यासाठी त्यांनी मुलीचे आभारही मानले आहेत. 'मी राफेलचा मुद्दा सोप्या शब्दांमध्ये स्पष्ट करु इच्छिते. ही पहिली कंपास पेटी (राफेल विमान) राहुल गांधींची आहे. ती रिकामी आहे आणि तिची किंमत आहे 720 कोटी रुपये. दुसरी कंपास पेटी मोदीजींची (राफेल विमान) आहे. ही अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज आहे. तिची किंमत आहे 1600 कोटी रुपये. एक गोष्ट राहुल गांधींच्या लक्षात येत नाही, ते ज्या किमतीबद्दल बोलत आहेत, ती केवळ विमानाची किंमत आहे. तर मोदीजींची विमानं शस्त्रास्त्रसज्ज आहेत,' अशा शब्दांमध्ये मुलीनं राफेल करार समजावला आहे.
Thanks for posting this. My special thanks to this smart young lady (dear child, if affection permitted) for taking interest in the matter of fighter aircraft #Rafale. My good wishes for her to fly one of them as a trained fighter pilot of the @IAF_MCC@DefenceMinIndiahttps://t.co/fsteyBIw1U
— Nirmala Sitharaman (@nsitharaman) January 10, 2019
एक भारत-श्रेष्ठ भारत नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना संरक्षणमंत्र्यांनी राफेल करार समजावणाऱ्या मुलीचं कौतुक केलं. 'या व्हिडीओसाठी मी या स्मार्ट मुलीला धन्यवाद देते. तुम्ही राफेल करारात जो रस घेतलात, त्यासाठी मी आपले आभार मानते. माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत. तुम्ही एक दिवस हवाई दलात वैमानिक व्हाल,' अशा शब्दांमध्ये सीतारामन यांनी मुलीचं कौतुक केलं.
गेल्या काही महिन्यांपासून राफेल डीलवरुन देशाच्या राजकारणात रणकंदन माजलं आहे. नुकत्याच संपलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही राफेलचा मुद्दा गाजला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी या मुद्द्यावरुन वारंवार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं. हिवाळी अधिवेशनात या संपूर्ण प्रकरणावर संरक्षणमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं. मात्र त्यानं काँग्रेसचं समाधान झालं नाही. संरक्षणमंत्र्यांनी अनेक प्रश्न अनुत्तरितच ठेवले, अशी प्रतिक्रिया यानंतर काँग्रेसनं दिली होती.