नवी दिल्ली: संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या ट्विटमुळे पुन्हा एकदा राफेल डीलचा मुद्दा चर्चेत आला आहे. राफेल डील नेमकं आहे तरी काय, हे समजावून सांगणाऱ्या एका आठ वर्षीय मुलीचा व्हिडीओ संरक्षणमंत्र्यांनी ट्विट केला आहे. या मुलीनं कंपास पेटीच्या मदतीनं संपूर्ण राफेल डील स्पष्ट करुन सांगितलं आहे. याबद्दल सीतारामन यांनी मुलीचे आभार मानले आहेत. राफेल विमानाची यूपीए आणि एनडीए सरकारच्या काळातील किंमत, त्यातील फरक एका आठ वर्षीय मुलीनं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या मुलीचा व्हिडीओ संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विटरवरुन शेअर केला आहे. यासाठी त्यांनी मुलीचे आभारही मानले आहेत. 'मी राफेलचा मुद्दा सोप्या शब्दांमध्ये स्पष्ट करु इच्छिते. ही पहिली कंपास पेटी (राफेल विमान) राहुल गांधींची आहे. ती रिकामी आहे आणि तिची किंमत आहे 720 कोटी रुपये. दुसरी कंपास पेटी मोदीजींची (राफेल विमान) आहे. ही अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज आहे. तिची किंमत आहे 1600 कोटी रुपये. एक गोष्ट राहुल गांधींच्या लक्षात येत नाही, ते ज्या किमतीबद्दल बोलत आहेत, ती केवळ विमानाची किंमत आहे. तर मोदीजींची विमानं शस्त्रास्त्रसज्ज आहेत,' अशा शब्दांमध्ये मुलीनं राफेल करार समजावला आहे.
VIDEO: आठ वर्षांच्या मुलीनं समजावला राफेल करार; संरक्षणमंत्र्यांनी मानले आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 10:16 AM