UP News : बस किंवा ट्रेनमध्ये लहान मुलांना खिडकीतून हात बाहेर काढण्यास किंवा डोकावून पाहण्यास मनाई केली जाते. यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. दरम्यान, उत्तर प्रदेशातील मथुरेतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक 8 वर्षीय मुलगी ताशी 100 किमी वेगाने धावणाऱ्या ट्रेनच्या खिडकीतून उडून बाहेर पडली. मुलगा जागेवर नसल्याचे पाहून तिचे आई-वडील घाबरले अन् त्यांनी तात्काळ ट्रेनची चेन ओढली.
मिळालेल्या माहितीनुसार, ही मुलगी मध्य प्रदेशातून आई-वडिलांसोबत गीता जयंती एक्सप्रेस ट्रेनने मथुरा येथे येत होती. ती ट्रेनच्या आपत्कालीन खिडकीजवळ बसलेली असताना, अचानक धावत्या ट्रेनमधून उडून खाली पडली. ट्रेन 17 किमी पुढे गेल्यावर आई-वडिलांना आपली मुलगी बेपत्ता असल्याचे समजले. त्यांनी तात्काळ चेन ओढून ट्रेन थांबवली आणि जंगलात मुलीचा शोध सुरू केला. 17 किमी पाठीमागे एका झुडपात त्यांना आपली मुलगी जखमी अवस्थेत आढळून आली. मुलीचा एक पाय मोडला, पण सुदैवाने तिचा जीव वाचला. रविवारी सायंकाळी उशिरा रुग्णालयात उपचार केल्यानंतर मुलीला घरी पाठवण्यात आले.
या अपघातात थोडक्यात बचावलेल्या आठ वर्षीय गौरीने सांगितले की, ती ट्रेनच्या खिडकीजवळ बसून लहान भावासोबत खेळत होती. अचानक एक वळण आले आणि वाऱ्यामुळे उडून बाहेर पडली. या भीषण अपघातात मुलीचा जीव वाचल्यानंतर आई-वडिलांनी देवीचे आभार मानले. नवरात्रीमध्ये देवीने एक चमत्कार केला, जो आपण कधीही विसरणार नाही. माझ्या मुलीचा दुसरा जन्म झाला आहे, अशा भावना गौरीच्या आईने व्यक्त केल्या.