संयुक्त राष्ट्र संघटनेची माहिती : ३९ जिल्हे हादरले; जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा, रोगराईचा इशारा, सरकार मदतीसाठी प्रयत्नशीलकाठमांडू : नेपाळच्या या विनाशी भूकंपाचा तडाखा ३९ जिल्ह्यांतील ८० लाख लोकांना बसला असून, नेपाळची एक चतुर्थांश लोकसंख्या भूकंपबाधित आहे, असे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. १४ लाख लोकांना अन्न हवे आहे, पाणी व तंबू यांचाही तुटवडा आहे, असे युनोने अहवालात म्हटले आहे. नेपाळचे पंतप्रधान भूकंप झाला तेव्हा इंडोनेशियात होते. रविवारी ते नेपाळमध्ये परतले असून, येताच त्यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली. नेपाळला तातडीने तंबू, पाणी व अन्नपदार्थ हवे आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. नेपाळच्या दुर्गम भागातून मदतीची विनंती केली जात आहे, पण प्रशासनाला त्यांच्यापर्यंत पोहोचणे शक्य झालेले नाही. मदत पोहोचण्यासाठी लागणारे साहित्य व तज्ज्ञ नसल्याने दुर्गम भागापर्यंत मदत अजून पोहोचू शकली नाही, असे त्यांनी सांगितले. अजूनही दुर्गम भागातील खेड्यांचा आढावा घेतलेला नाही, त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असून ती १० हजारापर्यंत जाऊ शकते. काठमांडू शहरातही शेकडो लोक अजूनही ढिगाऱ्याखाली दबले आहेत, तसेच डोंगराळ भागातही हीच परिस्थिती आहे. भारताचे राजदूत रणजित राय यांनी आज कोईराला यांची भेट घेतली व भारताकडून केल्या जाणाऱ्या मदतीची माहिती दिली. राजदूत राय यांनी नेपाळचे लष्करप्रमुख गौरव राणा यांची भेट घेतली असून भारतीय नागरिकांना परत भारतात पाठविण्याबद्दल बोलणी केली.११ जिल्हे भूकंपबाधित नेपाळ सरकारने ११ जिल्हे भूकंपबाधित घोषित केले असून त्यात सिंधूपालचौक, काठमांडू, नुवाकोट, धाडिंग, भक्तपूर, ललितपूर, गोरखा, कावरे, रासुवा यांचा या बाधित जिल्ह्यात समावेश आहे. एकूण ६० जिल्ह्यांना भूकंपाचा तडाखा बसला आहे. रोगराईचा इशारा नेपाळमधील भूकंप व त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीनंतर आता तिथे रोगराई पसरू शकते, असा इशारा देण्यात आला आहे. रुग्णालयात उपचारास नापसंतीभीषण भूकंपास चार दिवस उलटल्यानंतरही नेपाळमधील नागरिक अजूनही भीतीच्या सावटाखाली आहेत. जखमी लोक रुग्णालयात उपचार घेण्यास मनाई करीत आहेत. तंबूत उपचार करून घेण्याकडे त्यांचा कल आहे. केदार प्रसाद श्रीवास्तव (७५) यांच्या पोटाची शस्त्रक्रिया व्हायची आहे. मात्र, भूकंप आणि त्यानंतरच्या धक्क्यांमुळे ते भीतीच्या सावटाखाली आहेत. काठमांडू येथील वैद्यकीय महाविद्यालयाबाहेर उघड्यावर सुरू शिबिरात शस्त्रक्रिया व्हावी म्हणून ते आग्रही आहेत. भूकंपाचे झटके जाणवल्यानंतर श्रीवास्तव स्वत:हून रुग्णालयाबाहेर पडले. भूकंपाची एवढी भीती आहे की, ते स्वत:वर मैदानात पाऊस, थंडी व डास असलेल्या ठिकाणी शस्त्रक्रिया करून घेण्यास इच्छुक आहेत.सरकार मदतीस सज्जसरकार शक्य ते सर्व काही करत आहे. मदतकार्यासाठी आवश्यक साहित्य व तज्ज्ञ लोक आमच्याकडे नसल्यामुळे मदतकार्य प्रभावी होऊ शकले नाही. सारे काही परदेशी मदतीवर अवलंबून आहे. नेपाळसाठी ही वेळ अत्यंत कठीण आहे, असे नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला म्हणाले. ७.९ मॅग्निट्यूडचा भूकंप होऊन आता तीन दिवस उलटले असून, घरे व इमारती कोसळल्यामुळे बेघर झालेले नागरिक आता परदेशी हेलिकॉप्टरकडे नजर लावून बसले आहेत.गोरखा (नेपाळ) : नेपाळमधील दुर्गम गावात भूस्खलन व चिखलाची दरड कोसळून २५० जण बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. शनिवारच्या विनाशकारी भूकंपाचा केंद्रबिंदू या गावापासून फार दूर नाही. घोडातबेला नावाच्या या गावात आज प्रचंड बर्फवृष्टी होत आहे, असे जिल्हाधिकारी गौतम रिमाल यांनी सांगितले. घोडातबेलातील आपत्तीची प्राथमिक माहिती अधिकाऱ्यांना फोनवरून मिळाली; मात्र मध्येच संपर्क खंडित झाला. हे गाव लोकप्रिय गिर्यारोहण मार्गावर आहे.मात्र बेपत्ता लोकांमध्ये गिर्यारोहकांचा समावेश आहे काय हे समजू शकले नाही.बिहारमधील भूकंपबळींची संख्या ५८बिहारमध्ये आलेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ५८ वर पोहोचली आहे, तर १०० लोकांना मंगळवारी नेपाळच्या पोखरा येथून रक्सौल येथे परत आणण्यात आले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. रक्सौल येथे मदत शिबिरे बांधण्यात आली आहेत. नेपाळमधून सर्वांत जास्त लोक रक्सौल येथेच परत येत आहेत. त्यांना अन्न, पाणी, कपडे, औषधी अशा सर्व वस्तू पुरविल्या जात आहेत, असे नितीशकुमार म्हणाले.नेपाळमधील पर्यटकांच्या मदतीसाठी महाराष्ट्र सदनात स्थापन ‘नेपाळ आपत्ती समन्वय कक्षाच्या’ समन्वयातून आतापर्यंत राज्यातील ३०१ पर्यटकांना स्वगृही सुखरूप पाठविण्यात आले. साठ लोकांचा समूह गायब झाल्याची भीती व्यक्त होत असताना समन्वय कक्षातून ती निराधार असल्याचे सांगण्यात आले. भारताने मंगळवारी एनडीआरएफ कर्मचाऱ्यांची आणखी सहा पथके मदत व बचावकार्यासाठी काठमांडूला पाठविली आहेत. याआधी एनडीआरएफची दहा पथके मदतीसाठी तैनात आहेत. या पथकांनी आतापर्यंत ११ लोकांना वाचविले आहे आणि ७३ मृतदेह मलब्याखालून बाहेर काढले आहेत.पाटणा : व्हॉटस् अॅपवरून भूकंपाच्या संदर्भात अफवा पसरविल्याच्या आरोपात बिहारमधील माजी आमदार दयानंद राय यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अरारिया जिल्ह्यातील नारपतगंजचे माजी आमदार राय यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. काबूल : अफगाणिस्तानच्या ईशान्येकडील दुर्गम भागात मोठी दरड कोसळण्याची घटना घडली असून, त्यामुळे किमान ५२ लोक ठार झाले आहेत. बादकशान प्रांतात ही घटना घडली असून संपूर्ण भाग बर्फाखाली गाडला गेला आहे. उर्वरित देशापासून हा भाग तुटला असून, फक्त हवाई मार्गाने संपर्क साधणे शक्य आहे, असे प्रांतिक गव्हर्नर वालीउल्लाह अदीब यांनी सांगितले. बादकशान हा अफगाणिस्तानचा अविकसित व मागास प्रांत असून येथे दरडी कोसळण्याच्या घटना नेहमीच घडतात. वसंत ऋतूत बर्फ वितळू लागला की, दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढते. ताजिकीस्तान सीमेवरील काहवान येथे सकाळी ही दरड कोसळली. या गावाकडे जाण्यासाठी रस्ते नाहीत, त्यामुळे हवाई मार्गानेच जाणे शक्य आहे. बादकशान हा प्रांत हिंदुकुश पर्वत व पामिर पर्वतरांगांमध्ये आहे. ताजिकीस्तान व चीनच्या पूर्व टोकाला त्याच्या सीमा आहेत.