ऑनलाइन लोकमत -
कोल्लम, दि. १३ - पुत्तिंगल देवी मंदिरात फटाक्यांच्या आतषबाजीमुळे लागलेल्या भीषण आगीत होरपळून ११२ जणांनी आपला जीव गमावला आहे. या घटनेमुळे मंदिर परिसरात केली जाणारी आतषबाजीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या दुर्देवी घटनेमुळे एकीकडे देवळांच्या प्रांगणात फटाके उडविण्यावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी राज्यातील विविध स्तरांतून करण्यात येत असताना, पंकजाक्षी अम्मा मात्र गेली अनेक वर्ष याविरोधात लढा देत आहेत.
पंकजाक्षी अम्मा यांचं वय 80 वर्ष आहे. मंदिर परिसरात राहणा-या अनेक लोकांचा आतषबाजीला विरोध आहे. मात्र यातील कोणाचीही याविरोधात पुढे होऊन तक्रार करण्याची हिंमत झाली नाही. पण पंकजाक्षी अम्मा यांनी मंदिर प्रशासनाविरोधात तक्रार करण्याचं धैर्य दाखवत एकहाती लढा दिला आहे. पंकजाक्षी अम्मा यांचं घर मंदिरापासून अवघ्या 50 मीटरच्या अंतरावर आहे. दरवेळी जेव्हा आतषबाजी केली जाते तेव्हा पंकजाक्षी अम्मा यांच्या घराचं प्रचंड नुकसान होतं.
पंकजाक्षी अम्मा यांच्या लढ्याला 2012मध्ये सुरुवात झाली होती. 2 एप्रिलला पंकजाक्षी अम्मा यांनी जिल्हाधिका-यांकडे याबाबत तक्रार केली होती. ग्रामअधिका-याने पंकजाक्षी अम्मा यांचा जबाबदेखील नोंदवला होता. तक्रारीच्या आधारावर तपास करण्यात आला होता ज्याआधारे आतषबाजीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र मंदिर प्रशासन समितीने आदेश पायदळी तुडवत आतषबाजी करणार असल्याचं सांगितलं. सोबतच तक्रार केल्यामुळे पंकजाक्षी अम्मा आणि त्यांच्या कुटुंबियांना धमकीदेखील दिली. पंकजाक्षी अम्मा यांची मुलगी गेली चार वर्ष लंडनमध्ये वास्तव्याला असल्याने त्यांना चिंता लागून असते.
शनिवारी काही लोकांनी घरी येऊन धमकी दिली असल्याची माहिती पंकजाक्षी अम्मा यांनी दिली आहे. 'काही लोक आली होती, आम्ही आतषबाजी करणार आहोत आणि जर आम्हाला करु दिले नाही तर तुमची हत्या करुन मृतदेह नदीत टाकून देऊ अशी धमकी दिली होती', असं पंकजाक्षी अम्मा यांनी सांगितलं आहे. दरवर्षी आतषबाजीदरम्यान कुटुंब नातेवाईकांच्या घरी वास्तव्याला जातं. जेव्हा ते घरी परत येतात तेव्हा घराचं पुर्ण नुकसान झालेलं असत. अनेकवेळा तर मंदिर परिसरात शरिराचे तुकडेही सापडत असल्याचा दावा केला आहे.
पंकजाक्षी अम्मा यांचा जावई प्रकाश यांनीदेखील धमकी दिल्याचा आरोप केला आहे. '९ एप्रिलला दोन लोकांनी येऊन माझ्या सासूला शिवीगाळ केली. मात्र माझ्या सासूने रोखल्यामुळे मी काहीच केले नाही. 11.30 वाजता आतषबाजी सुरु झाल्यानंतर मी तेथे गेलो होतो. आम्ही तेथे गेलो असता मी आणि माझ्या पत्नीने दोन जखमींना घेऊन जाताना पाहिले. रुग्णवाहिकेचादेखील आवाज येत होता. मात्र आतषबाजी तरीही सुरु होती. 10 मिनिटांनी मोठा स्फोट झाल्याचा आवाज आला आणि सर्व वीज गेली आणि अंधार झाला', अशी माहिती प्रकाश यांनी दिली आहे.