जयपूर/नवी दिल्ली: भारताकडून नागरिकत्व न मिळाल्यानं पाकिस्तानातून आलेले ८०० हिंदू नागरिक पुन्हा पाकिस्तानला गेले आहेत. भारताकडून अपेक्षाभंग झाल्यानं हिंदू नागरिकांवर पाकिस्तानला परतण्याची वेळ आली. सीमांत लोक संघटनेनं ही माहिती दिली. या प्रकरणी ऑनलाईन यंत्रणेचा आढावा घेतला जात असल्याची माहिती गृह मंत्रालयानं दिली.
शेजारच्या देशांमध्ये असलेल्या अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्यात येईल अशी घोषणा मोदी सरकारनं केली होती. त्यामुळे अत्याचार सहन करत असलेले पाकिस्तानातील शेकडो नागरिक भारतात आले. यातील जवळपास ८०० पाकिस्तानी हिंदू पुन्हा पाकिस्तानाल गेले आहेत. हे नागरिक २०२१ मध्ये भारतात आले होते. भारताचं नागरिकत्व लवकर मिळेल अशी आशा त्यांना होती. मात्र कित्येक महिने उलटूनही नागरिकत्व न मिळाल्यानं ८०० पाकिस्तानी हिंदूंना पुन्हा पाकिस्तानला जावं लागलं. हे ८०० हिंदू नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून राजस्थानात राहत होते.
नागरिकत्वासाठी अर्ज करूनही कित्येक महिने काहीच न झाल्यानं ८०० नागरिक पाकिस्तानला परत केले. ते परतल्यावर पाकिस्तानच्या यंत्रणांनी त्यांचा भारताविरोधात वापर केला. त्यांना माध्यमांसमोर आणण्यात आलं. भारतात अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचं त्यांच्याकडून वदवून घेण्यात आलं, अशी माहिती सीमांत लोक संघटनेचे अध्यक्ष हिंदू सिंह सोधा यांनी दिली.
शेजारी राष्ट्रांमध्ये असलेल्या अल्पसंख्यांकांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी मोदी सरकारनं २०१८ मध्ये ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील हिंदू, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन आणि बुद्धिस्ट यांना भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करता येईल, असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं. त्यासाठी गुजरात, छत्तीसगड, राजस्थान, हरयाणा आणि पंजाबमधील १३ जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले होते.