ऑनलाइन लोकमत
रामपूर (उत्तरप्रदेश), दि. १५ - रस्ता रुंदीकरणात तोडले जाणारे घर वाचवण्यासाठी उत्तरप्रदेशमधील रामपूर येथे वाल्मिकी समाजाच्या ८०० जणांनी मंगळवारी इस्लाम धर्म स्वीकारला आहे. मुस्लीम धर्म स्वीकारला तर कोणीही तुमच्या घरांना हात लावणार नाही असे सरकारी अधिका-यांनी सांगितल्याने आम्ही नाईलाजास्तव इस्लाम धर्म स्वीकारला असे या धर्मांतर करणा-या नागरिकांचे म्हणणे आहे.
रामपूरमधील तोफखाना परिसरात शॉपिंग मॉल बांधले जात असून या मॉलकडे जाण्यासाठी रस्ता रुंदीकरणाचे कामही हाती घेण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी नगरपरिषदेने रस्ता रुंदीकरणात बाधा आणणा-या घरांची यादी तयार करत ही घरं पाडली जातील असे जाहीर केले. या विभागातील बहुसंख्य लोकं ही वाल्मिकी समाजातील आहेत. हातोडा पडणा-या घरांवर लाल रंगाची निशाणीही लावण्यात आली आहे. घर पाडण्याची नोटीस बजावणा-या नगरपरिषदेच्या अधिका-याने इस्लाम धर्म स्वीकारल्यास तुमची घरं वाचतील असे सांगतले होते असा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे. गेल्या चार दिवसांपासून स्थानिक रहिवासी उपोषण करत होते. मात्र नगरपरिषद व जिल्हाधिका-यांनी याची दखल न घेतल्याने या सर्वांनी १४ एप्रिलरोजी इस्लाम धर्म स्वीकारला. मात्र यासाठी शहरातील एकाही मौलानाने परिसरात येण्यासाठी नकार दिला. पोलिसांनी परिसराला वेढा घातल्याने मौलाना आमच्यापर्यंत पोहोचू शकले नाही असे अमर या स्थानिकाने सांगितले. तर आमीष किवा लालसेपोट इस्लाम धर्म स्वीकारणे पाप असल्याने आम्ही तिथे गेले नाही असे एका मौलानाने सांगितले.