अविनाश कोळी -सांगली : देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी वेगाने वाढत असल्याने स्टील उद्योगात सध्या चांगले वातावरण निर्माण झाले आहे. भारतातील मालाला अन्य देशांमधून विशेषत: चीनमधून मागणी वाढली आहे. देशातील उद्योजकांकडूनही या मागणीप्रमाणे मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जात आहे. २०१९-२० च्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात भारताकडूनचीनने आठपट अधिक स्टील खरेदी केले आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीत भारताकडून स्टील निर्यातीत तब्बल १४८ टक्के वाढ झाल्याचे निरीक्षण स्टील ॲथॉरिटी ऑफ इंडियाने नोंदविले आहे. एकीकडे निर्यात वाढत असताना, देशांतर्गत पुरवठा व मागणी यातील तफावतीमुळे दरात मोठी वाढ होत आहे. गेल्या सहा महिन्यांत स्टीलच्या दरात जवळपास ३५ ते ४० टक्के वाढ झाली आहे. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये भारतातील एकूण कच्च्या स्टीलचे उत्पादन १.८ टक्क्यांनी वाढले होते. २०१९ मध्ये एकूण १११.२ दशलक्ष टन उत्पादन झाले होते. २०२० मध्ये २९.७ टक्के उत्पादनात घट दिसून आली. मिळेल त्या ठिकाणाहून स्टील मागविण्याकडे चीनसह सर्व विकसनशील देशांचा कल वाढला आहे. भारतात स्टीलच्या आयातीपेक्षा निर्यात वाढली आहे. गेल्या दहा वर्षांत चीन प्रथमच भारताकडून स्टील मोठ्या प्रमाणात आयात करीत आहे. चीनमधील स्टील उत्पादनात चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीत ४.५ टक्के वाढ झाली असली, तरी वर्ल्ड स्टील असोसिएशनच्या मते २०२१ मध्ये चीनच्या स्टीलच्या मागणीत १०.६ टक्के वाढ राहण्याची चिन्हे आहेत.
चीनकडून स्टीलची ८०० टक्के आयात, दरात ४० टक्के वाढ; मागणीच्या तुलनेत देशांतर्गत उपलब्धता घटली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 3:23 AM