नवी दिल्ली - केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितसे की, भारत आणि चीन यांच्यात असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या भारत-तिबेट सीमा पोलिसांसाठी नव्या बटालियनची मंजुरी देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तसेच सरकार सर्व सुरक्षा दलांना परिवहन आणि रसद मदत प्रदान करण्याबाबत कटिबद्ध आहे. केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांनी रविवारी आयटीबीपीच्या ६० व्या स्थापना दिनी केलेल्या संबोधनामध्ये ही माहिती दिली.
त्यांनी सांगितले की, सरकारने गेल्या वर्षी आयटीबीपीसाठी ४७ नव्या सीमा चौक्या आणि एक डझन छावण्यांना मान्यता दिली होती. राय यांनी सांगितले की, आयटीबीपीसाठी नवे मनुष्यबळ आणि बटालियन उपलब्ध करण्यासाठी विचार विमर्ष अंतिम टप्प्यात आहे. तर अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आयटीबीपीला आपल्या नव्या सीमा छावण्यांसाठी सुमारे आठ हजार जवान आणि सात नव्या बटालियनांना मान्यता देण्याची अपेक्षा आहे. ही नवी बटालियन मुख्यत्वेकरून भारताच्या पूर्व भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अरुणाचल प्रदेश सेक्टरमध्ये तैनात करण्यात येतील.
आयटीबीपीच्या नव्या बटालियनांनी पूर्वोत्तर भागात एका सेक्टर मुख्यालयाला मान्यता देण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाजवळ दोन वर्षांहून अधिक काळापासून विचाराधीन आहे. आयटीबीपीच्या एका बटालियनमध्ये सुमारे एक हजार जवान असतात. राय यांनी गेल्या वर्षी मे-जून महिन्यात पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनसोबत झालेल्या हिंसक चकमक आणि दोन्ही देशांदरम्यान, सुरू असलेल्या तणावादरम्यान असामान्य शौर्याचे प्रदर्शन करून शत्रूला चोख उत्तर दिल्याबद्दल आयटीबीपीच्या जवानांचे कौतुक केले.