नवी दिल्ली : दिल्ली टेक्नॉलॉजिकल यूनिव्हर्सिटीच्या (डीटीयू) विद्यार्थ्यांनी एका लीटरमध्ये ८१ कि. मी. धावणारी कार विकसितत करून कार निर्मात्या कंपन्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. संस्थेच्या यांत्रिकी (मेकॅनिकल) विभागाच्या द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या २८ विद्यार्थ्यांनी ही कार तयार केली आहे. सिंगापूर येथे आयोजित ‘सुपर माइल्स’ प्रदर्शनात या कारचे प्रदर्शन करण्यात आले. या प्रदर्शनात आशियातील एकूण ३५ संघांनी भाग घेतला. त्यात भारतातील चार संघांचा समावेश होता. डीटीयूच्या संघाला १५ वी श्रेणी प्राप्त झाली. ही कार तयार करण्यासाठी चार ते पाच लाख रुपयांचा खर्च आला. अनेक प्रकारच्या धातूंचा वापर करून तयार केलेली ही कार कमी इंधनात जास्त धावते. तसेच तिच्यामुळे पर्यावरणाची फारशी हानी होत नाही. या प्रदर्शनात कारचे रुपडे, हॉर्न, रुंदी, इंजिन आणि सुरक्षेशी संबंधित विविध उपकरणांचे निरीक्षण करून त्याआधारे श्रेणी दिली जाते, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. सुपर माईल्समध्ये हर्षित आर्य (प्रमुख), भुवन अग्रवाल, जयराज गंभीर, अभय कुमार, समर्थ जैन, नेहल जलाल आणि अनिरुद्ध या सात विद्यार्थ्यांनी डीटीयूचे प्रतिनिधीत्व केले. ही अनोखी कार तयार करणारे विद्यार्थी रोहिणी, गाजियाबाद, नोएडा आणि दिल्लीसारख्या वेगवेगळ््या ठिकाणचे असून त्यांना प्रा. अतुल कुमार अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले.
एका लीटरमध्ये ८१ किमी धावणारी कार
By admin | Published: April 03, 2017 5:09 AM