लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये मोबाइल ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हे ग्राहक शहरी भागातील आहेत. त्याचवेळी ग्रामीण भागामध्ये काही प्रमाणात वाढ दिसून येत आहे. या गळतीचा सर्वाधिक फटका एअरटेलला बसला असून, जिओच्या ग्राहकांमध्ये मात्र वाढ झाली आहे.भारतीय दूरसंचार नियंत्रण प्राधिकरण (ट्राय)ने याबाबतच जाहीर केलेल्या आकडेवारीवरून मोबाइल-धारकांच्या संख्येतील मोठी घट स्पष्ट होत आहे. या महिन्यामध्ये स्थलांतरित कामगार शहरांमधून मोठ्या संख्येने गावी निघून गेल्याने शहरी भागातील मोबाइल वापरकर्त्यांची संख्या सुमारे ८२ लाखांनी कमी झाली आहे. मात्र याच काळामध्ये ग्रामीण भागातील वापरकर्त्यांची संख्या थोड्या प्रमाणात वाढलेली दिसून येते.मार्च महिन्याच्या अखेरीस देशातील मोबाइल वापरकर्त्यांची संख्या ११७७.९७ दशलक्ष होती. ती एप्रिल अखेर ०.७२ टक्क्यांनी कमी होऊन ११६९.४४ दशलक्ष झाली आहे. शहरी भागातील वापरकर्ते ६५६.४६ दशलक्षांवरून ६४७.१९ दशलक्षांवर आले आहेत. याच काळामध्ये ग्रामीण भागातील वापरकर्ते ५२१.५१ दशलक्षांवरून ५२२.२४ दशलक्ष झाले आहेत.या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर शहरांमधून ग्रामीण भागाकडे स्थलांतर झालेले असल्याने शहरी भागातील टेलिडेन्सिटी कमी झाली तर ग्रामीण भागातील डेन्सिटी वाढलेली दिसून येत आहे. या काळामध्ये उत्तर प्रदेश या एकाच राज्यामधील वापरकर्त्यांची संख्या वाढलेली दिसून आली.कुठे ग्राहकांमध्ये घट, तर कुठे झाली वाढएप्रिल महिन्यामध्ये भारती एअरटेलचे ५.२ दशलक्ष ग्राहक कमी झाले असून, ही संख्या सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ व्होडाफोन, आयडियाचा क्रमांक लागत असून, त्यांचे ४.५ दशलक्ष ग्राहक घटले आहेत. या पार्श्वभूमीवर जिओच्या ग्राहकांमध्ये मात्र वाढ झालेली दिसून आली आहे. एप्रिल महिन्यात जिओचे १.६ दशलक्ष ग्राहक वाढलेले आहेत.
एप्रिलमध्ये ८२ लाख मोबाइल ग्राहक घटले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 5:19 AM