मुंबई
कोरोना महामारीमुळे दैनंदिन जीवनशैलीत अभूतपूर्व बदल झाल्याचं पाहायला मिळालं. यात 'वर्क फ्रॉम होम' संस्कृती मोठ्या प्रमाणात वाढली आणि हळूहळू रुजण्यास देखील सुरुवात झाली आहे. कोरोनाआधीचा काळ कर्मचारी ऑफीसला जाण्यास प्राधान्य देत होते. पण आता कर्मचाऱ्यांनी ऑफिसऐवजी 'वर्क फ्रॉम होम' पद्धतच अधिक सोयीस्कर ठरत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. रोजगाराशी संबंधित वेबसाईट साइकीच्या 'टेक टॅलेंट आउटलुक'च्या रिपोर्टनुसार महामारीमुळे पहिल्यांदा कर्मचाऱ्यांवर वर्क फ्रॉम होम व्यवस्था थोपण्यात आली होती. पण आता दोन वर्षांनंतर 'वर्क फ्रॉम होम' कर्मचाऱ्यांच्या जीवनशैलीचाच भाग झाला आहे.
टॅलेंट टेक आऊटलूकनं केलेल्या सर्व्हेक्षणात समाविष्ट झालेल्यांपैकी ८२ टक्के कर्मचाऱ्यांनी ऑफीसऐवजी 'वर्क फ्रॉम होम' संस्कृतीलाच पसंती दिली आहे.
सर्व्हेक्षणात नेमकं काय समोर आलं?टॅलेंट टेक आऊटलूक २०२२ मध्ये चार देशांमधील १०० हून अधिक कार्यकारी अधिकारी आणि मानव संसाधन अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या विविध प्रतिक्रियांचं विश्लेषण करण्यात आलं आहे. हे सर्व्हेक्षण सोशल मीडिया, मुलाखती आणि पॅनल चर्चेच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. सर्वेक्षणात समाविष्ट झालेल्यापैंकी ६४ टक्के टक्के कर्मचाऱ्यांनी घरून काम केल्यामुळे उत्पादन क्षमता वाढल्याचं आणि तणाव देखील कमी झाल्याचं म्हटलं आहे.
सध्या 'वर्क फ्रॉम होम' संस्कृतीनं चांगला तग धरला असून ८० टक्क्यांहून अधिक मानव संसाधन व्यवस्थापकांनी आता पूर्णकाळ ऑफिसात येऊन काम करण्याची तयारी दाखवणारे कर्मचारी शोधण्यास खूप अडचणी येत असल्याचं नमूद केलं आहे. तर ६७ टक्के कंपन्यांनीही ऑफिसला येऊन काम करण्याची तयारी दाखवणारे कर्मचारी शोधणं कठीण झाल्याचं म्हटलं आहे.
'वर्क फ्रॉम होम' दैनंदिन जीवनशैलीचा भागबदलती जीवनशैली पाहता घरून काम करणं आता एक पर्याय नव्हे, तर जीवनशैलीचा भाग बनला आहे. आता प्रायोगिक क्षेत्रात काम करणारे देखील आपल्या कंपन्यांकडून वर्क फ्रॉम होमची इच्छा व्यक्त करत आहेत. ज्या कंपन्या अजूनही 'वर्क फ्रॉम होम'ची सुविधा देण्यास अपुऱ्या ठरत आहेत अशा कंपन्यांना आता गुणवत्तापूर्ण कर्मचारी मिळणं कठीण झाला आहे. तसंच आधीपासून कंपनीत काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना सोबत ठेवणं एक आव्हान ठरू लागलं आहे.