चेन्नई : पंजाब नॅशनल बँकेत नीरव मोदीने घडविलेला सुमारे १३ हजार कोटी रुपयांचा बँक घोटाळा ताजा असतानाच स्टेट बँक आॅफ इंडियात (एसबीआय) आणखी एक घोटाळा उघडकीस आला आहे.दागिने क्षेत्रातील शृंखला कंपनी कनिष्क गोल्ड प्रा. लि.ने हा घोटाळा केला असून, त्यामुळे एसबीआयसह १४ बँकांना ८२४.१५ कोटींपेक्षा जास्त रकमेचा फटका बसला आहे. याप्रकरणाची चौकशी करण्याची विनंती बँकेने सीबीआयला जानेवारीमध्येच केली होती, अशी माहिती आता समोर आली आहे.चेन्नईतील टी. नगर येथे कार्यालय असलेली कनिष्क गोल्ड ही कंपनी भूपेशकुमार जैन आणि त्याची पत्नी नीता जैन यांच्या मालकीची आहे. हे दाम्पत्य विदेशात फरार झाले असून, ते सध्या मॉरिशसमध्ये वास्तव्यास असल्याचे समजते. जैन दाम्पत्याशी संपर्क होत नाही, असे एसबीआयने तक्रारीत म्हटले आहे.याप्रकरणी सीबीआयने अद्याप गुन्हा नोंदविलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याचे आरोपीनीरव मोदी आणि मेहूल चोकसीहेही विदेशात फरार झालेआहेत. (वृत्तसंस्था)एक हजारहून अधिक कोटींचा फटकासूत्रांनी सांगितले की, कनिष्क गोल्ड कंपनीला एसबीआयच्या नेतृत्वाखाली १४ बँकांनी कर्ज दिले आहे. २५ जानेवारी २0१८ रोजी एसबीआयने सीबीआयकडे तक्रार नोंदविली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, एसबीआयने कंपनीला दिलेले मुद्दल कर्ज ८२४ कोटींचे आहे. व्याजासकट १ हजार कोटींपेक्षा जास्त फटका बँकेला बसला आहे. कंपनीने एका रात्रीत आपले सर्व स्टोअर्स बंद केले. मार्च २0१७ मध्ये कंपनीने कर्जावरील व्याज भरणे बंद केले होते. एप्रिल २0१७ मध्ये सर्व भरणाच बंद करण्यात आला. बँकांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता कंपनीचे प्रवर्तक गायब असल्याचे आढळून आले.
८२४ कोटी रुपयांचा नवा बँक घोटाळा! एसबीआयसह १४ बँकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:52 AM