नवी दिल्ली - आज कृषी कायद्यांना विरोध करण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागून झालेल्या दंग्यामध्ये सुमारे ८३ पोलीस जखमी झाले आहेत. यापैकी अनेक पोलिसांना गंभीर दुखापती झाल्या असून, त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.दिल्लीपोलिसांचे जॉईंट कमिश्नर आलोक कुमार यांनी सांगितले की, अॅडिशनल (ईस्ट) डीसीपी मंजीत यांच्यावर ट्रॅक्टर चालवण्याचा प्रयत्न झाला. सुरक्षा दलांनी प्रसंगावधान राखून त्यांना वाचवले. अन्यथा मोठा अपघात झाला असता. याशिवाय अन्य एका पोलीस अधिकाऱ्याला दुखापत झाली आहे. तसेच अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. यापूर्वी आंदोलनकर्ते शेतकरी आयटीओमध्ये पोहोचले आणि लुटियन्स भागात पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला.आंदोलनकर्त्यांनी ट्रॅक्टर परेडच्या निर्धारित वेळेच्या आधीच दिल्लीच्या सीमांमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली. तसेच रॅलीची परवानगी नसतानाही दिल्ली आयटीओपर्यंत धडक दिली.दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना राजपथावरील प्रजासत्ताक दिनाचे संचलन सुरू झाल्यानंतर निर्धारीत मार्गावरूनच परेड करता येईल या अटीसह ट्रॅक्टर परेडची परवानगी दिली होती.दरम्यान, ट्रॅक्टर मार्चला सुरुवात झाल्यानंतर काही आंदोलकांनी थेट लाल किल्ल्यापर्यंत धडक मारली. तसेच लाल किल्ल्यावर धार्मिक ध्वज फडकवला. दरम्यान, दिल्लीत आज उसळलेल्या हिंसे प्रकरणी काही एफआयआरची नोंद झाली आहे.