दीनहाता (प. बंगाल) : अनेक दशकांपासून संयम ढळू न देता, मतदानासाठी प्रतीक्षा करणाऱ्या १०३ वर्षीय असगर अली यांना गुरुवारी अखेर स्वप्नपूर्तीचा आनंद लाभला. सरकार स्थापण्याबाबत आपला आवाज ऐकला गेल्याचा हा क्षण त्यांनी मोठ्या अभिमानाने शाई लावलेले बोट दाखवत कॅमेऱ्यात बंदिस्त करवून घेतला. कारण स्वतंत्र भारतात आयुष्यात पहिल्यांदाच मतदान त्यांच्या नावावर नोंदले गेले.प. बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आज तब्बल ८४.२४ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. बंगालमध्ये यंदा विक्रमी मतदान झाल्यामुळे तिथे निकाल काय लागतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कूछबिहारच्या दीनहाता मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर ते सकाळीच गेले, तेव्हा या वयातही त्यांच्या चेहऱ्यावर स्वप्नपूर्तीचा उत्साह झळकत होता. सोबत त्यांच्या कुटुंबाच्या तीन पिढ्यांमधील प्रथमच मतदान करणारे मतदारही होते.पूर्वीच्या भारत-बांगलादेश सीमेवरील (चीतमहल) वस्त्यांतील ९७७६ मतदारांनी स्वतंत्र भारतात पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला. गेल्या वर्षी हे गाव औपचारिकरीत्या भारतात समाविष्ट झाले. माझे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे. मी समाधानी आहे, पण पुढील निवडणुकांमध्ये मतदान करू शकेल की नाही, याची मला खात्री नाही, असे अली यांनी पत्रकारांना सांगितले. (वृत्तसंस्था)२० टक्के मतदार ६० वर्षांवरील...निवडणूक आयोगाने पहिल्या मतदारांसाठी जागृती कार्यक्रम आयोजित केला होता. गेल्या वर्षी आॅगस्टमध्ये सीमेवरील १११ गावे भारतात तर ५१ गावे बांगलादेशात समाविष्ट झाली. पहिल्यांदाच मतदान करणारे २० टक्के लोक ६० वर्षांवरील आहेत. ओळखपत्र मिळाल्यापासूनच माझे आजोबा मतदानासाठी उत्सुक होते, असे त्यांच्यासोबत असलेल्या जयंत अबेदीन या नातवाने म्हटले.
पश्चिम बंगालमध्ये ८४.२४ टक्के मतदान
By admin | Published: May 06, 2016 1:57 AM