काँग्रेसचे ८४ वे अधिवेशन : तपास यंत्रणांचा सर्रास दुरुपयोग; सोनिया गांधी यांनीच गाजवला पहिला दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 02:18 AM2018-03-18T02:18:41+5:302018-03-18T02:18:41+5:30
राहुल गांधी पक्षाध्यक्ष झाल्यानंतरच्या पहिल्याच अधिवेशनाचा पहिला दिवस गाजवला मात्र यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भाषणानेच. राहुल गांधी यांनी छोटेखानी उद्घाटनपर भाषण करतानाच, आपण समारोपाच्या वेळी सविस्तर बोलणार आहोत, असे सांगून कार्यकर्ते व नेत्यांची उत्सुकता वाढवून ठेवली.
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : राहुल गांधी पक्षाध्यक्ष झाल्यानंतरच्या पहिल्याच अधिवेशनाचा पहिला दिवस गाजवला मात्र यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भाषणानेच. राहुल गांधी यांनी छोटेखानी उद्घाटनपर भाषण करतानाच, आपण समारोपाच्या वेळी सविस्तर बोलणार आहोत, असे सांगून कार्यकर्ते व नेत्यांची उत्सुकता वाढवून ठेवली. सोनिया गांधी यांनी केलेल्या उस्फूर्त आक्रमक भाषणामुळे नेते व कार्यकर्तेही भारावून गेले.
मी खाणार नाही व खाऊ देणार नाही, असे मोदी सांगत होते. पण ते नाटक होते. मते व सत्ता मिळवण्याचा तो एक डाव होता, हे लोकांना आता लक्षात आले आहे, असे सांगून मोदी सरकार सीबीआय, ईडी यंत्रणांचा सर्रास दुरूपयोग करीत असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला.
काँग्रेसला संपवण्यासाठी सरकार बनावट खटले दाखल करीत आहे. पण मोदी यांनी साम, दाम, दंड व भेदाचा कितीही वापर केला तरी काँग्रेस त्यापुढे वाकणार नाही, अशा शब्दांत त्यांनी सरकारला ठणकावले. सरकार संसदेचा अनादर करीत आहे, असा आरोप त्यांनी केला. यूपीए सरकारने सुरू केलेल्या योजना कमकुवत करण्याचे काम मोदी सरकार करीत आहे, अशी टीका त्यांनी केली.
मोदी सरकारने निर्माण केलेल्या स्थितीला तोंड देण्याचे आवाहन त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले. देशासमोर मोठी आव्हाने असताना राहुलने ्पक्षाध्यक्षपद स्वीकारले आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने आपण स्वत: पक्षासाठी काय करू शकतो हे निश्चित केले पाहिजे, असे त्यांनी म्हटले.
सोनिया गांधी यांनी १९ वर्षांपूर्वी आपण कोणत्या स्थितीत सक्रिय होण्याचा निर्णय घेतला हे सांगितले. त्या म्हणाल्या की, मला राजकारणात यायचे नव्हते. परंतु, काँग्रेस दुबळी होत असल्याने व पक्षाचे मूलभूत सिद्धांत संकटात सापडल्याने अध्यक्षपद स्वीकारायचा निर्णय मी घेतला.
काँग्रेस घेणार व्यावहारिक भूमिका
काँग्रेसने शनिवारी भारतीय जनता पक्ष-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी तसेच समान व राबवता येईल असा कार्यक्रम तयार करण्यासाठी समविचारी पक्षांसोबत सहकार्य करण्याची व्यावहारिक भूमिका घेण्याचा निश्चय केला. भाजपशी एकत्रितपणे लढण्यास वेगवेगळ््या विरोधी पक्षांमध्ये सहमती घडवण्यासाठी काँग्रेसने सुरू केलेल्या प्रयत्नांतून निवडणूकपूर्व मैत्रीचे संकेत मिळतात.
परदेशातील राजकीय प्रतिनिधी : अधिवेशनाच्या व्यासपीठावर नेत्यांची चित्रे नव्हती. स्टेडियममधील फलकांवर राहुल गांधी यांचेच छायाचित्र होते. सोनिया गांधी यांचेही छायाचित्र नव्हते. काँग्रेसने यंदा विविध देशातील राजकीय पक्षांना आमंत्रित केले. त्यामुळे चीनसह जवळपास डझनभर देशांचे प्रतिनिधी तिथे होते.
कुमार केतकर व्यासपीठावर : ज्येष्ठ पत्रकार व चारच दिवसांपूर्वी महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेले कुमार केतकर यांच्याकडे या अधिवेशनाचे सूत्रसंचालन होते. केतकर यांना राहुल गांधी यांच्या टीममध्ये महत्त्वाचे स्थान असेल, हे त्यातून जाणवले.
पासवान यांच्याशी संपर्क : बिहार व उत्तर प्रदेशात महाआघाडीची काँग्रेसची इच्छा आहे. रामविलास पासवान यांनी दलित, आदिवासी खासदारांसाठी प्रीतीभोजनाचे आयोजन केले होते. काँग्रेसनेही याला संमती दिली होती. काँग्रेसच्या एका नेत्याने पासवान यांच्याशी अप्रत्यक्ष संपर्क साधणे सुरु केले आहे.