मुंबई : अरबी समुद्रात आलेल्या ताैक्ते चक्रीवादळाच्या काळात मुंबईजवळील समुद्रातील तेल क्षेत्र ‘बॉम्बे हाय’मधील घटनाक्रमाची चौकशी सुरू असून त्याअंतर्गत तेल व नैसर्गिक वायू महामंडळाच्या (ओएनजीसी) तीन कार्यकारी संचालकांना निलंबित करण्यात आले आहे. बॉम्बे हायमधील ८६ कामगारांचा चक्रीवादळात बळी गेला असून अधिकाऱ्यांनी वादळाच्या पूर्वसूचनेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.ताैक्ते चक्रीवादळातही काम सुरू ठेवल्यामुळे बॉम्बे हायमध्ये असंख्य लोक अडकून पडले होते. भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाने ६२८ जणांची सुटका केली होती.निलंबित करण्यात आलेले तीन वरिष्ठ अधिकारी अनुक्रमे ड्रिलिंग, सुरक्षा आणि शोध मोहीम विभागांचे प्रमुख आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंतच्या काळासाठी त्यांना निलंबित करण्यात आले आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने नियुक्त केलेली समिती या घटनेची चौकशी करीत आहे. बॉम्बे हायच्या इतिहासातील चक्रीवादळामुळे घडलेली ही सर्वांत मोठी दुर्घटना ठरली आहे. सूत्रांनी सांगितले की, स्टॉर्म जिओ या खाजगी संस्थेने वादळ निकट आल्याचा इशारा दिला होता. वादळामुळे समुद्राची पातळी ७ ते ९ मीटरने वाढणार असल्याचेही इशाऱ्यात म्हटले होते. याची माहिती पी३०५ डेक अधिकाऱ्याने वरिष्ठांना कळवून पुढील आदेश मागितले होते. तथापि, अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून अनेकांचा जीव धोक्यात घातला, असे पुरावे चौकशी समितीसमोर आले आहेत.दरम्यान, तेल क्षेत्रातील अधिकाऱ्यांची संघटना ‘असोसिएशन ऑफ सायन्टिफिक अँड टेक्निकल ऑफिर्स’ने (आस्टो) निलंबनाच्या कारवाईस आक्षेप घेतला आहे. या दुर्घटनेस कंत्राटदार कंपनी मे. ॲफकॉन्स जबाबदार असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
Tauktae Cyclone: ताैक्तेचे ८६ बळी; ओएनजीसीचे तीन कार्यकारी संचालक निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2021 6:06 AM