लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांमध्ये देशातील काेराेनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने चिंता वाढली हाेती; मात्र रुग्णसंख्येत पुन्हा घट हाेताना दिसत आहे. देशात गेल्या चाेवीस तासांमध्ये नव्या रुग्णांची संख्या ३५ हजारांच्या खाली आली आहे. देशात ३३ हजार ३७६ नव्या रुग्णांची नाेंद झाली असून ३०८ रुग्णांचा मृत्यू झाला; मात्र नव्या रुग्णांपैकी सुमारे ८८ टक्के रुग्ण फक्त केरळ आणि महाराष्ट्र या दाेन राज्यांमध्येच आढळले आहेत. आराेग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये ३२ हजार १९८ रुग्ण बरे झाले आहेत. नव्या ३३ हजार ३७६ रुग्णांपैकी २५ हजार रुग्ण केवळ केरळातील आहेत. केरळमध्ये २० हजार १० नवे रुग्ण आढळून आले. तर महाराष्ट्रात ४ हजार १५४ रुग्णांची नाेंद झाली. देशभरातील सुमारे ८८ टक्के नव्या रुग्णांची नाेंद केरळ आणि महाराष्ट्रातच झाली आहे.
देशात २२ आणि २३ ऑगस्टला काेराेनाच्या नव्या रुग्णांचा आकडा २५ हजार हाेता. त्यानंतर आकडा वाढू लागल्याने चिंता वाढली हाेती. त्यातही केरळमध्ये सातत्याने रुग्णसंख्येत वाढ झाली हाेती. केरळमध्ये ३१ ऑगस्टपासून सलग तीन दिवस नव्या रुग्णांची संख्या ३० हजारांहून अधिक हाेती.