नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) सोमवारी बारावीचा निकाल जाहीर केला असून, इतिहासात यंदा प्रथमच कोणीही टॉपर नाही व गुणवत्ता यादीही जाहीर केलेली नाही. ज्या विषयांची परीक्षा घेण्यात आली नव्हती, त्यामध्ये सरासरी गुण देण्यात आले आहेत. यापूर्वी सीआयएससीईनेही दहावी-बारावीचा निकाल जाहीर करताना टॉपर जाहीर केला नव्हता.सीबीएसईचे परीक्षा नियंत्रणक संयम भारद्वाज यांनी सांगितले की, यंदा ८८.७८ टक्के विद्यार्थी बारावी परीक्षा उत्तीर्ण झाले. यात ९२.१५ टक्के विद्यार्थिनी व ८६.१९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या तुलनेत ५.९६ टक्के जास्त विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. मागील वर्षीचा निकाल ८३.४० टक्के लागला होता. यंदा १२,०३,५९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ११,९२,९६१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १०,५९,०८० विद्यार्थी पास झाले. विभागवार निकाल पाहता त्रिवेंद्रम विभागाचा निकाल सर्वाधिक (९७.६७ टक्के) लागला आहे. त्यानंतर बंगळुरू ९७.०५ टक्के, चेन्नई ९६.१७ टक्के व दिल्लीचा निकाल ९४.३९ टक्के आहे. पुणे विभाग नवव्या क्रमांकावर असून, निकाल ९०.२४ टक्के लागला. कोरोना महामारीच्या उद्रेकामुळे सीबीएसईला प्रलंबित परीक्षा रद्द करावी लागली होती. तथापि, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी वैकल्पिक परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या निकालात सुधारणा करायची आहे, ते या परीक्षेला बसू शकतात.निकाल पाहण्यात अडथळेसीबीएसईची वेबसाईट ठप्प झाल्यामुळे विद्यार्थ्यांना काही काळ निकाल पाहता आला नाही. उमंग अॅपवर निकाल दिसत नव्हता व आयव्हीआरएस सेवेवरही फोन व्यग्र येत होता, अशा तक्रारी होत्या.
सीबीएसई बारावी परीक्षेत ८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, विद्यार्थिनींनी मारली बाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 12:04 AM