केरळ उच्च न्यायालयाने (Kerala HC) पत्नीवर चाकू हल्ला करणाऱ्या 91 वर्षीय वृद्धाला हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. थेवन असे या वृद्धाचे नाव आहे. यासंदर्भात भाष्य करताना, "थेवन यांनी हे लक्षात ठेवायला हवे की, वृद्धापकाळात केवळ पत्नीच त्यांना आधार देईल. म्हातारपणी लोक त्यांच्या जोडीदारावर आंधळेपणाने विश्वास ठेवत असतात," असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ८८ वर्षीय कुंजली यांनी पती थेवन (९१) यांच्यावर इतर महिलांशी संबंध असल्याचा आरोप केला होता. पत्नीच्या या आरोपामुळे थेवन अत्यंत अस्वस्थ झाले. यानंतर या दोघांमध्ये वाद झाला. दरम्यान थेवन यांनी कुंजली यांच्यावर चाकूने हल्ला केला. यात त्या गंभीर जखमी झाल्या. या घटनेनंतर थेवन यांना अटक करण्यात आली होती. तसेच त्यांना न्ययालयीन कोठडीत पाठवण्यात आले. आता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.
यावेळी न्यायालय म्हणाले, थेवन यांना हे माहीत असायला हवे की, त्यांच्या वृद्धापकाळात त्यांची सर्वातम मोठी ताकद त्यांची पत्नी आहे. तसेच कुंजली यांनीही विचार करायला हवा की, त्यांची एकमेव ताकद त्यांचे पती थेवन हे आहेत. एक यशस्वी विवाह म्हणजे, जेव्हा एक 'परफेक्ट कपल' सोबत येते, तो नसतो, तर जेव्हा अपूर्ण कपल आपल्या मतभेदांचाही आनंद घ्यायला शिकते तो असतो.
न्यायालयाने पुढे म्हटले, थेवन आणि कुंजली यांना हे माहित असायला हवे की, वय प्रेमाचा प्रकाश कमी करत नाही, तर तो अधिक उजळवते. ८८ वर्षीय कुंजली अजूनही तिच्या पतीवर प्रेम करते आणि म्हणूनच तिचे तिच्या पतीवर बारकाईने लक्ष असते.