- रवींद्र देशमुख
मुंबई - लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून संपूर्ण देशात भारतीय जनता पक्षाने शानदार कामगिरी करताना ३०० चा टप्पा पार केला. तर एनडीएला ३५० हून अधिक जागा मिळाल्या आहेत. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना देखील आपल्या पारंपरिक अमेठीतून मतदार संघात पराभव पत्करावा लागला. परंतु, वायनाडमधूनही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राहुल यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.
अमेठीतून पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांची जेवढी चर्चा झाली, त्या तुलनेत वायनाडमधील त्यांच्या मताधिक्याकडे गांभीर्याने पहिले गेले नाही. नरेंद्र मोदी उद्या पंतप्रधानपदाची शपथ घेत असताना राहुल यांचा वायनाड मतदारसंघ अचानक चर्चेत आला आहे. साक्षरता आणि येथे असलेली विविध धर्मांची आकडेवारी यामुळे वायनाड चर्चेत आले आहे. यामध्ये साक्षरता मुद्दा अधिक गाजत आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना वायनाडमधून तब्बल ७ लाखांहून अधिक मते मिळाली आहेत. तर त्यांचे मताधिक्य चार लाखांच्या घरात आहे. मात्र चर्चा आहे, की वायनाडमध्ये ८९ टक्के साक्षर जनता असून त्यांनी राहुल गांधी यांना निवडून दिले. येथील जातीची समीकरणे पाहिल्यास, वायनाड जिल्ह्यात ५० टक्के हिंदू, २८ टक्के मुस्लीम आणि २१ टक्के ख्रिश्चन आहेत. मात्र ही आकडेवारी मतदार संघाची नसून जिल्ह्याची आहे. त्यामुळे यावर शंका आहे.
दरम्यान 'डेटा नेट' या वेबसाईटनुसार वायनाड मतदार संघात हिंदू, मुस्लीम अनुक्रमे ४० आणि ४५ टक्के आहेत. तर १५ टक्के ख्रिश्चन आहेत. त्यामुळे सात लाख मते घेणाऱ्या राहुल यांना साक्षर मतदारांचे मते मिळालेच शिवाय हिंदू आणि मुस्लीम दोघांची मते मिळाल्याचे स्पष्ट होते. यावरून आश्चर्य याचे व्यक्त होते की, साक्षरतेत आघाडीवर असलेल्या वायनाडने राहुल गांधी यांना निवडले. तसेच भविष्यातील १०० टक्के साक्षर भारतात राहुल गांधींना पसंती मिळणार याचे तर है धोतक नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतोय.
वाराणसीत ७७ टक्के साक्षरता
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीमधून लोकसभा निवडणूक लढवली. या मतदार संघाचे मोदी दुसऱ्यांदा प्रतिनिधीत्व करत आहेत. वाराणसीमधून मोदींनी तब्बल ६ लाख ७४ हजार ६६४ मते घेतली. याच वारणसीत साक्षरतेचे प्रमाण ७५ टक्के आहे. मात्र ८९ टक्केच साक्षर असलेल्या केरळमध्ये भाजपला इतर राज्यांच्या तुलनेत फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे कमी साक्षरता असलेल्या मतदार संघात भाजपला लाभ तर होत नाही, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.